आजपासून गोव्यात मिळणार ‘रापणी’ची मासळी..!
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्यात 1 जूनपासून मच्छीमारीवर बंदी जारी करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जून महिना ते 12 जुलैपर्यंत गोवेकारांना ताजी मासळी मिळविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता. मात्र, काल शनिवार दि. 12 जुलैपासून स्थानिक मच्छीमारांनी रापणीद्वारे मासेमारीला प्रारंभ केल्याने आजपासून मार्केटात ताजी मासळी उपलब्ध होणार आहे.
ट्रॉलरद्वारे मासेमारीला 2 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, दरवर्षी 12 जुलैपासून रापणीद्वारे मासेमारी केली जाते. त्यामुळे गोवेकरांना ताजी मासळी उपलब्ध होत असते. काल शनिवारी कोलवा, बाणावली, वार्का, माजोर्डा इत्यादी भागातील पारंपरिक मच्छीमारांनी रापणीद्वारे मासेमारीला प्रारंभ केला.
काल पहिल्याच दिवशी रापणीत बांगडे, कोळंबी, छोटी मोरी व करमट इत्यादी मासळी सापडली. ही मासळी संध्याकाळी मडगावच्या एसजीपीडीएच्या मार्केटात विक्रीसाठी आली होती. तरी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बरीच गर्दी जमली होती. ताजी मासळी असल्याने मासळीचा भाव मात्र, जरा जास्तच होता.
सर्व काही कामगार उपलब्धीवर अवलंबून
रापणीद्वारे मासे पकडण्यासाठी कामगार आवश्यक असतात. जर कामगार भेटले तरच समुद्रात रापण टाकणे शक्य होते. रापण टाकल्यानंतर ती ओढून समुद्रकिनाऱ्यावर आणावी लागते. हे काम एका-दोघांचे नसून जर कामगार मिळाले तरच रापणीद्वारे मासेमारी केली जाईल अशी माहिती बाणावली येथील मच्छीमारांनी दिली. बरेच कामगार हे आपल्या मूळ गावी गेले असून ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक मच्छीमार एकमेकांना मदत करून रापणीद्वारे मासळी पकडण्याचे काम करतात. गावी गेलेले कामगार जुलै अखेरपर्यंत परत येतील अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे.