धरतीच्या उदरातून पर्यटकांच्या हृदयगिरीवर उदगिरी
चिंचोली / अशोक जाधव :
शाहूवाडी तालुक्यातील शितूरउदगिरी हे सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्याच्या सीमेवर आहे. चांदोली धरण व अभयारण्याच्या सानिध्यात उंचसखल व विस्तीर्ण असा हा पठारी प्रदेश आहे. थंड व दमट हवामानात जैवविविधतेने नटलेले हे पठार दुर्मिळ फुलांच्या प्रजातींनी नटले असून पर्यटकांना भुरळ घालते.
- जैवविविधतेचा अभ्यास ही काळाची गरज निसर्गाचा कॅनव्हास
फुले ही केवळ वनस्पती नाहीत तर निसर्गाच्या कॅनव्हासवर उमटणारी रंगांची अप्रतिम उधळण आहे. ऋतूनुसार बदलणारी त्यांची रूपे, रंग आणि सुगंध पर्यावरणाला एक आगळावेगळा आनंद देतात. उदगिरी पठार हा निसर्गाचा जिवंत गालिचा आहे. फुलांच्या रंगांची उधळण, लोककथा व स्थानिक परंपरा यामुळे हा परिसर अभ्यासकांसाठी प्रयोगशाळा तर पर्यटकांसाठी रवर्ग ठरत आहे.
- वैविध्यपूर्ण फुलांचा मेळावा
धनगर फेटा फुल दांड्यावर फेट्यासारखा भाग; सूर्यकिरणांनी पांढरेशुभ्र भासते. सीतेची आसवं हे आख्यायिकेनुसार सीतेच्या अश्रूमुळे जांभळ्या फुलावर पांढरा ठिपका दिसतो. तर रानजीरा (तारा गुच्छ) फुले सुकल्यावर बी जीऱ्यासारखे दिसते. तेरडा/गवर गौरी-गणपतीच्या आसपास उमलणारे गुलाबी, थंड हवेत बुटके पण आकर्षक फुले आहेत.
- जैवविविधतेचे महत्त्व
फुले केवळ शोभेची नाहीत; ती सकारात्मक ऊर्जा पसरवणारी नैसर्गिक संपत्ती आहे. अभ्यास, संवर्धन व पर्यटनाशी जोडलेले नियोजन महत्त्वाचे आहे. हे पठार भविष्यात संशोधक व निसर्गप्रमींसाठी आदर्श प्रयोगशाळा ठरू शकते.
- फुले बहरात येण्याची वेळ
"येत्या काही दिवसांत फुले पूर्ण बहरात येतील आणि पठार निसर्गाच्या अद्वितीय सौंदर्याने नटलेले असेल. येथील फुलोत्सव विलोभनीय ठरणार आहे." असे स्थानिक ग्रामस्थ कोंडीबा टारेंनी सांगितले.
- फुलोत्सवाची टाईमलाईन
ऑगस्ट सप्टेंबरच्या सुरुवातीस फुले उमलू लागतात. सप्टेंबर अखेर व ऑक्टोबरच्या मध्यावर पठार फुलांनी गच्च बहरलेले असते. नोव्हेंबर महिन्यात बहुतांश फुले सुकायला सुरुवात होते.
- कसे जाल उदगिरी पठारावर ?
जवळचे शहर : कोल्हापूर (सुमारे ६० किमी), रेल्वे स्थानक : कोल्हापूर किंवा कराड, बस सुविधा : शाहूवाडीमार्गे शितूरउदगिरीपर्यंत एस. टी. बसेस. भेट देण्याचा उत्तम काळ सप्टेंबर ते ऑक्टोबर हे दोन महिने
- दुर्मिळ फुलाचा फुलोरा
गौरीची किंवा तेरड्याची फुले
धनगराचा फेटा किंवा गेंद फुले
कुडकुडीची फुले
रानजीरा फुले
सीतेची आसवं