देश आपला-घनिष्ट मैत्रीपासून कट्टर शत्रुत्वापर्यंत...
इस्रायल-हिजबुल्ला-इराण यांच्यातील संघर्षाची भारतालाही धग
शिरोभाग
सध्या मध्य-पूर्वेत इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या संघर्षाचे रुपांतर इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धातही होऊ शकते. त्यामुळे तो साऱ्या जगाच्या चिंतेचा विषय झाला आहे. इस्रायलच्या विरोधात असणाऱ्या हमास आणि हिजबुल्ला या दोन्ही इस्लामी दहशतवादी संघटनांना इराणचे सक्रीय साहाय्य आणि पाठबळ असते. त्यामुळे इस्रायल आणि या दोन संघटना यांच्यातील संघर्षाची पाळेमुळे इराणपर्यंत जाऊन पोहचतात. इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध नेमके कसे आहेत, ते सध्या आहेत तसेच पूर्वीपासून होते का, या संबंधांचे स्वरुप पालटले असेल तर त्यासाठी कोणती कारणे आहेत आणि भविष्यकाळात या दोन देशांमधील संबंध जगाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहेत, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हा मध्यपूर्वेतील संघर्ष भडकला तर भारतावरही त्याचे मोठे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तो समजून घेणे आवश्यक आहे. त्याचे विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न...
- मध्य-पूर्वेतील वाळवंटी प्रदेश हा त्या भागात प्रभावी असणाऱ्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मांमधील संघर्षांनी वेढलेला आहे. तो शेकडो वर्षांपासूनचा आहे आणि आधुनिक काळातही शांतता प्रस्थापित झालेली नसून, नजीकच्या भविष्यात तशी कोणतीही शक्यताही दिसत नाही, अशी येथील सध्याची वस्तुस्थिती आहे.
- पहिल्या महायुद्धापूर्वी (इसवी सन 1914 ते 1918) हा प्रदेश बृहत ओटोमान साम्राज्याचा भाग होता. हे साम्राज्य तुर्कस्तानातील मुस्लिमांचे होते. पहिल्या महायुद्धानंतर हे साम्राज्य लयाला गेले. त्याचे अनेक तुकडे नंतर ब्रिटीश आणि फ्रेंच जेत्यांनी केले. या प्रक्रियेतून या भागात आजची अनेक राष्ट्रे निर्माण झाली.
- सौदी अरेबिया, कुवेत, इराक, संयुक्त अरब अमिरात, सिरीया, लेबेनॉन, जॉर्डन, पॅलेस्टाईन इत्यादी अनेक राष्ट्रांची निर्मिती या प्रक्रियेतून झाली. या राष्ट्रांमध्ये प्रारंभापासूनच धार्मिक आणि पांथिक संघर्ष राहिला आहे. इस्लाममधील सुन्नी आणि शिया या दोन पंथांमधील ऐतिहासिक संघर्षाचे हे प्रतिबिंब आहे.
- 1948 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर पॅलेस्टाईनच्या प्रदेशात इस्रायल नामक ज्यू राष्ट्राची निर्मिती अमेरिका आणि ब्रिटन यांच्या पुढाकाराने झाली. तीन हजार वर्षे ज्या ज्यू समाजावर अनेक देशांमधून परागंदा होण्याची किंवा अनेक देशांमध्ये अन्याय सहन करण्याची वेळ येत होती, त्याला स्वत:चा देश यामुळे मिळाला.
- तथापि, सुन्नी आणि शिया यांच्यात आधीपासूनच असणाऱ्या या भागातील संघर्षात आता तिसऱ्या भिडूची भर पडली. आपल्या अरब भूमीवर ज्यू देश निर्माण होणे हे येथील इस्लामी देशांना सहन झाले नाही. त्यामुळे इस्रायलच्या स्थापनेच्या प्रारंभापासूनच या देशाला संपविण्याचा प्रयत्न या देशांकडून अनेकदा झाला आहे.
- त्यामुळे इस्लामी राष्ट्रांमधील पांथिक संघर्ष आणि त्याला नंतर मिळालेली इस्रालयाच्या स्थापनेची जोड यामुळे हा भाग नेहमीच संघर्षमय राहिलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर जगात जितकी युद्ध झाली, त्यांच्यातील सर्वाधिक युद्धे याच भागात झाली आहेत. शिवाय सातत्याने होणारे संघर्षही याच भागात सर्वाधिक आहेत.
इस्रायल-इराण संबंध...
- इस्रायलची स्थापना झाल्यानंतर अल्पावधीतच त्याच्याशी सुन्नी पंथिय इस्लामी देशांनी उभा दावा मांडला होता. इजिप्तचा त्यात पुढाकार होता. सौदी अरेबिया आणि इतर सुन्नी देश प्रत्यक्ष संघर्षात नसले तरी त्यांची या नव्या ज्यू देशाला मान्यता नव्हती. मात्र, इस्रायलला विरोध करणाऱ्या सुन्नी देशांना शियांचे बाहुल्य असणाऱ्या इराणचा विरोध होता. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो मित्र, या नात्याने त्या काळात इस्रायल आणि इराण यांच्यात घनिष्ट मैत्रीचे संबंध होते. या संबंधांना अमेरिकेचे भक्कम पाठबळ होते कारण इस्रायलचे अस्तित्व आणि प्रगती यांची हमीदार म्हणून अमेरिका कार्यरत होती. त्यामुळे सारे बऱ्यापैकी आलबेल होते.
- त्यावेळी इराणमध्ये शाह मोहम्मद रझा पेहलवी यांची राजवट होती. ती लोकशाही राजवट नसली तरी आत्ताच्या तुलनेत कितीतरी मवाळ, आधुनिकतेचा स्वीकार न नाकारणारी, शांततावादी आणि धार्मिक कट्टरता नाकारणारी होती. त्यामुळे इस्रायलप्रमाणेच अमेरिका आणि युरोपचेही या राजवटीशी बऱ्यापैकी संबंध होते. अर्थातच, एका पक्षात इस्रायल, अमेरिका, युरोप तर दुसऱ्या पक्षात इस्रायलचे अस्तित्व खुपणारी अरब राष्ट्रे अशी सर्वसाधारण विभागणी निदान इस्रायलच्या संदर्भात होती. याशिवाय अन्य कारणांवरून संघर्षाची ही समीकरणे नेहमी बदलत असत. पण इस्रायलचा जोडीदार म्हणून एकेकाळी इराणची ओळख होती.
इस्रायल-इराण संघर्षाचा प्रारंभ
- तथापि, इस्रायल आणि इराण यांच्यातील मैत्री न पाहवणारा एक मोठा धार्मिक कट्टर वर्ग इराणमध्ये होता. त्या वर्गाचे नेतृत्व शिया धर्मगुरुंकडे होते. शिया आणि सुन्नी यांच्यात संघर्ष असला तरी त्याचा लाभ इस्रायलला होऊ नये. इस्रायल हा शियांचाही शत्रूच आहे असे या वर्गाचे मत होते. इराणच्या शहांची राजवट इस्लामविरोधी आहे, अशीही या गटाची समजूत होती आणि त्यामुळे ही राजवट उलथून टाकण्यासाठी या गटाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते.
- 1979 मध्ये या गटाच्या प्रयत्नांना यश आले. इराणमध्ये धार्मिक क्रांती झाली. मवाळ आणि आधुनिकतावादी शहांची राजवट जाऊन आता इस्लामी शिया राजवटीला सुरवात झाली. या परिवर्तनासमवेतच इस्रायल आणि इराण यांच्यातील संबंध 180 अंशाच्या कोनात बदलले. इराणमध्ये धार्मिक राजवट आल्यानंतर काही वर्षांमध्येच एकेकाळी दाट मैत्री असणारे हे दोन देश एकमेकांचे डावैरी बनले. इस्रायल घुसखोर देश आहे त्यामुळे तो संपला पाहिजे असा इराणचा आग्रह होता.
- इराणची सत्ता तेथील शिया धर्मगुरु आयातोल्ला खोमेनी यांच्या हाती गेल्यानंतर इराणने इस्रायलविरोधात प्रक्षोभक भाषा उपयोगात आणण्यास प्रारंभ केला. मध्य-पूर्वेत मुस्लीम सोडून अन्य कोणत्याही धर्माच्या लोकांचे राज्य असता कामा नये. इस्रायलींना भूमध्य समुद्रात बुडविले पाहिजे. इस्रायल हा ‘छोटा सैतान’ असून अमेरिका हा ‘मोठा सैतान’ आहे, अशी दरडावणीची भाषा होऊ लागली.
- इराणमधील राजकीय आणि धार्मिक बदलांमुळे मध्यपूर्वेतील समीकरणे पूर्णत: बदलली. पूर्वी एकमेकांचे मित्र असणारे इस्रायल आणि इराण हे देश एकमेकांचे शत्रू बनले. तर दुसरीकडे सौदी अरेबिया, इजिप्त आणि इतर छोट्या सुन्नी मुस्लीम अरब देशांनी इस्रायलशी जुळवून घेण्यास प्रारंभ केला. त्यांचे इस्रायलवर प्रेम होते किंवा आहे, म्हणून नव्हे, तर इराणला पायबंद घालण्यासाठी हे करावे लागले.
- दुसरे महत्वाचे कारण असे, की इस्रायलच्या स्थापनेनंतर 1990 पर्यंत अरब देशांशी त्याची जी युद्धे झाली, त्यांच्यात इस्रायलने त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे इस्रायलशी जुळवून घेणे हे त्यांनी श्रेयस्कर मानले. अनेक अरब देशांनी इस्रायलला एक राष्ट्र या नात्याने मान्यताही दिली. तथापि, इराणने मात्र कट्टर भूमिका घेत, इस्रायलला प्रखर विरोध करण्याची प्रक्रिया सुरुच ठेवली होती.
संघर्षातला आणि संघर्षाबाहेरचा संघर्ष...
- मध्य-पूर्वेतील संघर्षाचे राजकारणही कधी सरळसोट नसते. इराणचा एकीकडे इस्रायलशी शाब्दिक संघर्ष होत असतानाच इराणने इस्लामी जगाचा नेता होण्याचा प्रयत्नही चालविला होता. इस्लामी जग म्हणून ज्याचा उल्लेख होतो ते देश आपल्या अंकित असावेत. त्यांनी सौदी अरेबिया या सुन्नी शक्तीचे नेतृत्व मानू नये, अशीही इराणची इच्छा होती. त्यासाठी त्याने इराक हा देश ताब्यात घेण्यासाठी त्या देशाशी युद्ध छेडले. इराकमध्ये सद्दाम हुसेन यांच्या ‘बाथ’ पक्षाची सत्ता होती. हा पक्ष ‘डाव्या आधुनिक’ विचारसरणीचा म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे इराणच्या कट्टर धार्मिक दृष्टीच्या सत्तेला तो इस्लामविरोधी वाटत होता.
- त्यामुळे या देशाचा काटा काढण्यासाठी इराणने युद्ध केले. 80 च्या दशकात प्रारंभ झालेले हे युद्ध तब्बल 15 वर्षे चालले. या युद्धात इराण आणि इराक या दोघांचीही आतोनात हानी झाली. इराक ताब्यात आल्यास आपले पेट्रोलियमचे साठे सौदी अरेबियाच्या साठ्यांपेक्षा मोठे होतील आणि आपण इस्लामी जगाने नेतृत्व करण्यास धर्माप्रमाणे आर्थिकदृष्ट्याही समर्थ होऊ अशी इराणची भावना होती.
इस्रायलचा लाभ
इस्लामी जग या वर्चस्ववादासाठीच्या युद्धात गुंतल्याचा लाभ इस्रायलला मोठ्या प्रमाणात झाला, असे अनेक तज्ञांचे मत आहे. या काळात अरब देशांनी इस्रायलची कुरापत कमी प्रमाणात काढली. त्यामुळे इस्रायल आपल्या तंत्रवैज्ञानिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीचा वेग वाढवू शकला. आपण केवळ अमेरिकेवर अवलंबून राहता कामा नये. आपल्या भोवतीच्या शत्रूंशी स्वबळावर प्रदीर्घकाळ संघर्ष करता आला पाहिजे, ही इस्रायलची भूमिका प्रारंभापासून होतीच. त्या दिशेने काम करण्यास या काळात इस्रायलला बरीच उसंत मिळाली, असे म्हटले जाते.
इराण-इराक संघर्ष बरोबरीत सुटला. पण कटुपणा कायमचा राहिला. इराणची इस्लामी जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा सौदी अरेबिया आणि अमेरिकेने हाणून पाडली. इराण त्यामुळे धुसफुसत राहिला. त्यामुळे त्यांने 21 व्या शतकात इस्रायल हेच आपले लक्ष्य मानले आहे. इस्रायलचा नायनाट करण्यासाठी त्याने गाझापट्टी आणि दक्षिण लेबेनॉन येथील अनुक्रमे हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना पंखाखाली घेतले. इस्रायलचा नायनाट आपल्या हातून झाल्यास इस्लामी जगाचे नेतृत्व आपल्याकडे येईल, ही इराणची अंत:स्थ भावना आजही आहे.
आता सध्याची परिस्थिती...
- सध्याच्या परिस्थितीत इराणने इस्रायलचा नायनाट करण्याचा चंग बांधलेला आहे. युद्धात इस्रायलचा पराभव करणे शक्य नाही, म्हणून हिजबुल्ला आणि हमास या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इस्रायलचा शक्य कितका रक्तपात करायचा, त्याला क्षीण करायचे हे इराणचे धोरण दिसून येते.
- इस्रायलला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्याने आपल्या संरक्षणाची पूर्ण सज्जता केल्याचे दिसते. हमासला तुलनेने शांत केल्यानंतर आता हिजबुल्लाचा शक्तिपात करण्यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे. ‘पेजर हल्ल्या’मुळे इस्रायल कोठपर्यंत पोहचू शकतो, हे साऱ्या जगाला दिसून आले आहे.
भारतावर परिणाम...
- इराणने नुकताच इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. इराणने थेट इस्रायलवर इतका मोठा हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे हा संघर्ष भडकून त्याचे इस्रायल-इराण युद्धात रुपांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास जगासह भारतावर त्याचे व्यापक परिणाम होणार आहेत.
- मध्य-पूर्वेतील कच्च्या तेलाचे भाव यामुळे वाढू शकतात. भारत हा मोठ्या प्रमाणात तेल आयात करणारा देश आहे. त्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या संघर्षाचे अणुयुद्धात रुपांतर होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. पण तसे झालेच तर काय परिणाम होईल, हे अनाकलनीय ठरणार आहे.
- इस्रायल-इराण संघर्षात अमेरिका, रशिया, चीन अशा महाशक्ती उतरल्यास भारतासह साऱ्या जगावर अधिक व्यापक आणि दु:सह परिणाम होणार हे निश्चित आहे. पण नेमके काय होणार हे आजच्या घडीला सांगता येणे कठीण आहे. आणखी काही दिवसांमध्ये या संघर्षाचे नेमके चित्र आणि परिणाम समोर येतील.