चॅम्पियन्स ट्रॉफी ते आशिया चषक!
2025 मध्येही टीम इंडियाचे भरगच्च वेळापत्रक : जानेवारीत इंग्लंडविरुद्ध मालिकेने प्रारंभ : प्रत्येक महिन्यात असणार सामने
वृत्तसंस्था/ मुंबई
31 डिसेंबर हा 2024 वर्षाचा शेवटचा दिवस. भारतीय क्रिकेट संघाने या वर्षात अनेक चढ-उतार पाहिले. टी 20 वर्ल्डकप जिंकत भारतीय संघाने चाहत्यांची दिवाळी गोड केली. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड चॅम्पियन बनली असली तरी संघाला अनेकदा लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता, सरत्या वर्षाच्या कटू आठवणी मागे सोडत, नवा इतिहास रचण्यासाठी टीम इंडियाला सज्ज व्हावे लागेल. 2025 या नव्या वर्षातही भारतीय संघाचे भरगच्च वेळापत्रक असून यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया चषकासारख्या महत्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे.
जवळपास दर महिन्याला भारतीय संघ सामने खेळताना दिसणार आहे. नव्या वर्षाची सुरुवात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचव्या कसोटीने करणार आहे. ही कसोटी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी भारताला जिंकणे गरजेचे आहे. सिडनी कसोटी जिंकण्यात टीम इंडियाला यश आले तरी श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या मालिकेच्या निकालावर भारतीय संघाला अवलंबून रहावे लागेल. यानंतर भारतीय संघाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच टी 20 व तीन वनडे सामने खेळायचे आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया सज्ज
भारतीय संघाने 2013 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर 2017 मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. आता, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 11 वर्षाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएलचा हंगाम सुरु होईल. नवे खेळाडू आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज होईल, यात शंकाच नाही. पुढे सप्टेंबरमध्ये हायब्रीड पद्धतीनेच आशिया चषक भारतात खेळवला जाणार आहे. यामुळे ही स्पर्धासुद्धा निश्चितच रंगतदार होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे, वनडे, टी 20 सोबत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (भारताबाहेर), वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) खेळणार आहे. एकंदरीत टीम इंडियाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असणार आहे. याशिवाय, क्रीडा प्रेमींना नव्या वर्षात सामन्यांची पर्वणी पहायला मिळणार, हे नक्की!
भारतीय संघाचे वेळापत्रक (2025-26)
- जानेवारी - ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा कसोटी सामना (सिडनी)
- जाने-फेब्रु - इंग्लंडविरुद्ध 5 टी 20 व 3 वनडे (मायदेशात)
- फेब्रु-मार्च - चॅम्पियन्स ट्रॉफी (पाकिस्तान व दुबई)
- आयपीएल 2025 - भारतातील वेगवेगळी शहरे
- जून - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (पात्र ठरल्यास)
- जून ते ऑगस्ट - इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (इंग्लंड)
- ऑगस्ट - बांगलादेशविरुद्ध 3 वनडे व 3 टी-20 सामने
- सप्टें-ऑक्टो - आशिया चषक (मायदेशात)
- ऑक्टोबर - विंडीजविरुद्ध दोन कसोटी सामने (भारतात)
- ऑक्टो-नोव्हें- ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे व 5 टी20 सामने (ऑस्ट्रेलिया)
- नोव्हें-डिसें - आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी.