जपानमध्ये फ्रेंडशिप मॅरेज
कायदेशीरदृष्ट्या पती-पत्नी, घरात केवळ मित्र
सामाजिक चौकटीत विवाह एक महत्त्वपूर्ण बंधन असते. विवाहाशिवाय परिवाराची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. परंतु कालौघात अनेक गोष्टी आता बदलत आहेत. हा बदल अन्य नातेसंबंधांसोबत विवाहात देखील होत आहे. आमच्या देशात हा बदल मंदगतीने होत असला तरीही विदेशात हा बदल अत्यंत वेगाने घडत आहे.
वैवाहिक संबंधांना जगभरात पवित्र मानले गेले आहे. परंतु जपानमध्ये विवाहाची एक वेगळीच संकल्पना रुढ झाली आहे. सध्याच्या युगात लोक विवाह करू इच्छितात, परंतु त्याच्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि भावनानंशी जुळवून घेऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे.
विवाह केवळ ‘मैत्री’ आहे
जपानमध्ये फ्रेंडशिप मॅरेज नावाचा एक ट्रेंड सुरू आहे. हा प्रकार स्वत:च्या बेस्ट फ्रेंडसोबत विवाह करण्याचा प्रकार नाही. तर विवाहाला केवळ मैत्रीपुरती कायम ठेवण्याचा ट्रेंड आहे. यात दोन जोडीदार कायदेशीरदृष्ट्या विवाह करतात. परंतु त्यांच्यात पती-पत्नीसमान नातेसंबंध नसतात. तसेच ते अपत्यांना जन्मही देत नाहीत. यात दोघेही परस्परांशी भावनात्मक स्वरुपातही जोडले जात नाहीत. तसेच पारंपरिक विवाहानंतरच्या प्रथांचे पालन करत नाहीत.
विचित्र पद्धत
कोलारुस नावाच्या एजेन्सीने जपानमध्ये फ्रेंडशिप मॅरेजशी निगडित आकडेवारी जमविली आहे. यानुसार मार्च 2015 पर्यंत सुमारे 500 जणांनी अशाप्रकारचा विवाह केला होता. अशाप्रकारची जोडपी एका छताखाली राहू शकतात किंवा वेगवेगळे देखील राहू शकतात. या जोडप्याला अपत्य हवे असल्यास कृत्रिम आयव्हीएफद्वारे ती जन्माला येतात. हा एकप्रकारे विवाह कमी आणि रुममेट्ससमान जगण्याचा प्रकार आहे.