दोन मुस्लीम देशांमध्ये 10 वर्षांनी मैत्री
एक भारताचा मित्र, तर दुसरा पाकिस्तान समर्थक
वृत्तसंस्था/ अंकारा
जगातील दोन सर्वात कट्टर शत्रू देश इजिप्त आणि तुर्किये यांच्यात सुमारे एक दशकानंतर मैत्री निर्माण होणार आहे. तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान हे इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांचा हा दौरा ऐतिहासिक मानला जात आहे. गाझामधील युद्धावरून पश्चिम आशियात तणाव निर्माण झाला असताना एर्दोगान यांचा हा इजिप्त दौरा होत आहे. एर्दोगान आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी या दोघांनीही परस्परांना एक दशकांपासून शत्रू घोषित पेले होत.
2013 मध्ये अल सिसी यांनी इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या विरोधात बंड केल्यावर हे शत्रुत्व निर्माण झाले होते. मोर्सी हे एर्दोगान यांचे घनिष्ठ सहकारी मानले जात होते. परंतु 2021 मध्ये इजिप्त आणि तुर्कियेदरम्यान पडद्याआडून चाललेल्या राजनयिक प्रयत्नांनंतर संबंध पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. 2022 मध्ये सिसी आणि एर्दोगान याची कतारमधील फुटबॉल स्पर्धेवेळी भेट झाली होती. मागील आठवडयात तुर्कियेचे विदेशमंत्री हकान फिदान यांनी इजिप्तला किलर ड्रोन्सचा पुरवठा करू शकतो असे वक्तव्य केले होते. दोन्ही देशांदरम्यान ड्रोन आणि अन्य तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यावरून करार झाल्याचे त्यांनी म्हटले होते.
एर्दोगान यांना झुकावे लागले
गाझा युद्धादरम्यान फिदान यांनी कैरोचा दौरा केला होता. तसेच अध्यक्ष सिसी समवेत इजिप्तच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. अरब क्रांतिनंतर तुर्किये आणि इजिप्त यांच्यात काही मुद्द्यांवरून शत्रुत्व निर्माण झाले होते. परंतु आता द्विपक्षीय संबंध सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तुर्किये आता संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियासोबतचे संबंधही सुधारू पाहत आहे. इजिप्तसोबत चर्चा याच प्रयत्नांचा हिस्सा असल्याचे मानले जाते. तुर्कियेने आता मुस्लीम ब्रदरहुडच्या नेत्यांपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे.