For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मित्र पक्षांची खडाखडी!

06:24 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
मित्र पक्षांची खडाखडी
Advertisement

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन अवघ्या तीन दिवसांवर आलेले आहे. या अधिवेशनात सरकारचा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाच्या झुलीत उजवून काढण्याचा आणि अखेरच्या क्षणी का होईना मंत्री केले, अशी बोळवण करण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थात आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार म्हणत अनेकांचे शिवलेले जॅकेट उसवले. आता घाई गडबडीत त्यांना पुन्हा नवीन जॅकेट शिवावे लागणार असे दिसते. निवडणुकांना सामोरे जाताना कोणालाही नाराज करायचे नाही आणि कोणाच्याही मतदारांमध्ये घट होणार नाही याची काळजी घ्यायची अशी सरकारची योजना दिसते. पण नेते हे ऐकायला तयार दिसत नाहीत. किंवा या नेत्यांना त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी मुद्दामहूनच बोलायला लावले असण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वी त्यामुळेच सत्ताधारी पक्षात खडाखडी सुरू झालेली दिसते. अर्थात या सगळ्याची बीजे दिल्लीतील भाजपच्या बैठकीत रुजलेली दिसतात. महाराष्ट्र भाजपमध्ये नेतृत्व बदल करण्याचे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ला जबाबदारीतून मोकळे करण्याची मागणी केली त्याचा परिणाम पक्षात उमटू लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी नेतृत्व विनोद तावडे यांच्याकडे सोपवले जाईल अशी एक चर्चा होती. मात्र बदललेल्या परिस्थितीत नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर कायम राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा आदेश दिला आहे. पण, यापुढे फडणवीस एकट्याने निर्णय घेऊ शकणार नाहीत, कोर कमिटीच्या बैठका घेऊन संयुक्त निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नेतृत्वात बदल न करता एकनाथ शिंदे यांना भाजपच्या खालोखाल जिंकलेल्या जागांचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले आहे. शिवसेनेची हिंदुत्ववादी मते शिंदे यांनी आपल्याकडे कायम राखली आणि उद्धव ठाकरे यांना टक्कर दिली. त्यामुळे विधानसभेला त्यांचे महत्त्व कायम ठेवले जाणार हे स्पष्ट झाले आहे. तिसरा पक्ष अजित दादा आणि त्यांची राष्ट्रवादी पार्टी रा. स्व. संघाच्या विरोधानंतर सुद्धा आपल्याबरोबर कायम ठेवण्याच्या भूमिकेपर्यंत भाजप आलेला दिसतो. या सगळ्याचा परिणाम मंत्रिमंडळ विस्तारात देखील दिसणार आहे. त्यामुळे त्याचे पडसाद उमटत आहेत. सत्तेतील तीन पक्ष एकमेकाला खेचण्यात अजिबात मागेपुढे पाहायला तयार नाहीत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांचे नाव काढले. अजितदादा सरकारमध्ये जरा उशिरा सामील झाले असते तर आमच्या लोकांना पुरेशी मंत्रीपदे मिळाली असती असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता असा खुलासाही त्यांनी नंतर केला. पण त्यापूर्वी अजितदादांमुळे तुमची लंगोट सावरली असा प्रतिहल्ला आमदार अमोल मिटकरी यांनी करून वादाला फोडणी दिली. राष्ट्रवादी विरुद्ध बोलता बोलता रामदास कदम यांनी भाजपकडेही मोर्चा वळवला. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपले पुत्र योगेश कदम यांना मुद्दामहून त्रास देण्यास सुरुवात केली असून कोकणातील सगळ्या मतदारसंघांवर भाजपचा डोळा असल्याची टीका त्यांनी केली आहे. आपण फक्त भाजपवरच बोललो असे व्हायला नको म्हणून ते अधूनमधून ठाकरे सेनेवर विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका करतानाही दिसले. मात्र तरीसुद्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांमध्ये असलेला दुरावा त्यांच्या वक्तव्यातून उघडकीस आला. मित्र पक्षांना भाजप धोका करत असल्याचा रामदास कदम यांचा आरोप किंवा राष्ट्रवादीमुळे आपल्या पक्षाची पंचाईत झाल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा न करता केली असेल यावर विश्वास बसत नाही. आता तर मुख्यमंत्री शिंदे हे आपले व्याही लागतात, त्यांच्या मुलाला आपल्या नात्यातील मुलगी दिली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. त्यामुळे आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीतील चर्चित सोयरिकी आता शिंदे शिवसेनेसारख्या पक्षातसुद्धा प्रसिद्ध होत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळेच कदाचित हसत हसत रामदास कदम यांनी सगळंच काढलं असावं. कदम यांनी हा वाद उकरून काढण्यापूर्वी सुद्धा भाजप आणि त्यांच्या पक्षात वाद झालेलेच आहेत. शिंदे यांना यश मिळाले कारण भाजपच्या मतदारांची मते शिंदे यांना मिळाली मात्र शिंदेंच्या मतदारांनी भाजपला मतदान केले नाही अशी भाजपची भूमिका आहे. अजितदादांच्या मुळे भाजपच्या अनेक तगड्या उमेदवारांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जगदीश मुळीक, बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील, निलय नाईक, मधुकरराव पिचड, शिरीष चौधरी, अंबरीश राजे आत्राम, राजकुमार बडोले, स्नेहलता कोल्हे, योगेश टिळेकर, समरजितसिंह घाटगे यांना वाटाघाटीत आपला मतदार संघ राष्ट्रवादीकडे जाऊ नये अशी प्रार्थना करायची वेळ आली आहे. असो सत्ताधारी मंडळीत इतके पेटले आहे म्हंटल्यावर विरोधकांना खुमखुमी आली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. शरद पवार यांनी आपण लोकसभेला कमी जागा घेतल्या पण विधानसभेला तसे  करणार नाही असे म्हंटले आहे. ठाकरेंची शिवसेना राज्यात नेतृत्व आपले असेल तर आपल्याला ज्यादा जागा हव्यात असे म्हणत आहे तर तिन्ही पक्षांनी प्रत्येकी 96 जागा घ्याव्यात असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही आपल्या वाढलेल्या ताकदीची शक्ती जाणवू लागली आहे. पक्षाचे वरिष्ठ एकमेकाशी एकनिष्ठ राहण्याची भाषा करत असले तरी वादाचे मुद्देही पुढे येत आहेत. अधिवेशनात हे पक्ष कसे वागतात यावरून ही त्यांची फक्त खडाखडी आहे की खरेच जुंपणार तेही समजेल. सुरुवात तर झाली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.