For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वातंत्र्य-सर्वांगिण विकासाची सोनेरी गुरुकिल्ली

06:54 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वातंत्र्य सर्वांगिण विकासाची सोनेरी गुरुकिल्ली
Advertisement

सामाजिक व आर्थिक बदल हे केवळ कविकल्पनांनी होत नसतात. या बदलांना हवी असते एक बैठक. तत्त्वज्ञानाची, कृतीची आणि प्रगतीशील ऊर्जेची. स्वातंत्र्य ही सर्वांगिण विकासाची सोनेरी गुरुकिल्ली आहे अशा आशयाचे विधान जॉर्ज वॉशिंग्टन यांनी केले होते. अमेरिकेच्या वसाहतींनी 1776 साली इंग्रजांशी लढून स्वातंत्र्य मिळविले आणि त्यानंतर 150 वर्षातच अमेरिकेने विकासाचे संपूर्ण परिदृश्य बदलून टाकले. परंतु भारताने तर 1947 साली स्वातंत्र्य मिळविले आणि 75 वर्षातच विकास व प्रगतीची घौडदौड केली आहे. 

Advertisement

पोलादी पडद्यातील रशियानंतरचा चीन याची तुलना केल्यास भारताची ही वाटचाल रशिया आणि चीनपेक्षाही विलोभनीय गतिमान अशी आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होऊन भारत आता अमृत काळात विकसित आणि स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे संक्रमण पर्व आहे. हे विचार पर्व आहे. हे विवेक पर्व आहे.

हिंद स्वराज्य या ग्रंथामध्ये महात्मा गांधींनी म्हटले होते की, माझा लोकशाही भारत तो असेल ज्यामध्ये गरिबातल्या गरीब व्यक्तीला बलशाली व्यक्तीएवढी समान संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे शिक्षकाचे सुपुत्र अटलबिहारी वाजपेयी आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले नरेंद्र मोदी हे भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले. हा भारतीय संविधानाचा अद्भुत चमत्कार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, आपणास आपल्या राजकीय लोकशाहीचे सामाजिक व आर्थिक लोकशाहीत रूपांतर करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. तसे करू शकलो तर आपली लोकशाही अधिक दृढ आणि मजबूत होऊ शकेल. त्यांचे भविष्य खरे ठरले आहे. ए एल बाशेम यांनी लिहिलेल्या ‘वंडर दॅट वॉज इंडिया’ या ग्रंथामध्ये त्यांनी भारताच्या प्राचीन सभ्यतेचे आणि प्राचीन काळात भारताने संपादन केलेल्या गौरवशाली यशाचे चित्र मांडले आहे. ते चित्र केवळ मिथक नव्हे तर ते वास्तव होते आणि या वास्तवाचा प्रत्यय 21 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकानंतरच प्रत्ययास येत आहे.

Advertisement

9 ऑगस्ट 1942 ला भारतामध्ये स्वातंत्र्याची क्रांती झाली. त्यानंतर भारताने केलेली वाटचाल पाहता ही क्रांती फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन राज्यक्रांती या पेक्षाही सर्वंकष व सर्वसमावेशक म्हटली पाहिजे. 1947 मध्ये खंडीत स्वातंत्र्य मिळाले. अखंड भारताचे दोन तुकडे झाले. दु:खद प्रसंगांचा हृदयाचा बांध फोडणारा रक्तरंजित इतिहास आजही आपल्या डोळ्यापुढे आहे. आज शेजारच्या देशामध्ये उपासमार, दारिद्र्या आणि दैन्य यांचे थैमान आहे. परंतु भारताने मात्र विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण, उद्योग, अंतराळ संशोधन अशा विविध क्षेत्रात प्रगतीचा मोठा दूरचा टप्पा गाठला आहे.

अस्थिर परिस्थितीमध्ये इंग्रजांनी देश सोडला तेव्हा आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हे ओळखले की, आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. आम्हाला प्रगतीचा वेग वाढवावयाचा असेल तर प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरावी लागेल. नेहरू युगामध्ये म्हणजे 1950 मध्ये भारतामध्ये कानपूर या ठिकाणी पहिल्या भारतीय तंत्रनिकेतन संस्थेची स्थापना झाली आणि आयआयटीच्या स्थापनेनंतर एकानंतर एक भारतामध्ये आयआयटींच्या उभारणीस गती देण्यात आली. कधी अमेरिकेच्या मदतीने, कधी सोव्हिएट रशियाच्या मदतीने, कधी स्वबळावर अशा प्रकारे विज्ञान तंत्रज्ञान संस्थांचा झपाट्याने विस्तार झाला. त्यातून नवे शोध आणि प्रगतीची नवी क्षितिजे उजळू लागली. भारताने पाहता पाहता न्युक्लियर एनर्जी, आण्विक ऊर्जा, पवन ऊर्जा, पारंपरिक ऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रामध्ये विक्रमी प्रगती केली. आज भारतामध्ये कुठेही भारनियमन नाही. ऊर्जा क्षेत्रातील ही स्वयंपूर्णता भारताच्या विकासाचा पाया आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मंगळावर आपले यान पाठविले. तसेच चंद्रयान प्रथमच चंद्राच्या दक्षिण भागामध्ये उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. आदित्य एल-1 या यानाने सूर्याच्या भोवती फेऱ्या घालत सूर्याबद्दलचे प्रगत संशोधन आरंभिले आहे. अंतराळ संशोधनापासून ते सागर संशोधनापर्यंत आणि भूजल संशोधनापर्यंत भारताने केलेली प्रगती पाहता विज्ञानाच्या आधारे आपण आपल्या देशाचे चित्र संपूर्णपणे बदलू शकतो हे भारताने निश्चित केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या 10 वर्षात भारतामध्ये अंतर्गत रस्त्यांचे जाळे तयार केले आहे. 2023-24 सालापासून भारत दररोज 34 किमी एवढी रस्त्याची वाढ करीत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष आयसेन होवर यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चार पदरी, पाच पदरी रस्त्यांचे जाळे तयार केले होते. त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा गेल्या 5 वर्षात आर्थिक दळणवळणाच्या ज्या रक्तवाहिन्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.

10 वर्षापूर्वी जगाच्या 11 व्या क्रमांकावर असलेला देश आज 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला आहे आणि आगामी 3 वर्षामध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. हे कसे घडून आले? ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्या इंग्रजांचे सर्व उपग्रह भारताच्या अंतराळयानातून श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रातून सोडण्यात आले. ही प्रगती मोठी अद्भुत आहे. आमच्यावर राज्य करणाऱ्या साम्राज्यवादी सत्तेला मागे टाकून आम्ही 5 व्या क्रमांकावर पोहोचलो आणि आता जपान, जर्मनी यांनासुद्धा मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची भक्कम तयारी करीत आहे. अर्थव्यवस्थेतील महिलांच्या सहभागाचा वाटा आगामी काळात 24 टक्क्यांनी अधिक वाढणार आहे. जागतिक बँकेने म्हटले होते, जर मध्यमवर्ग आणि महिलांचा तसेच दलित व वंचितांचा राष्ट्रीय विकासातील सहभाग वाढला, तरच भारत तिसऱ्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहू शकतो. या दिशेने विचार करता, भारतीय महिलांनी दाखविलेला रचनात्मक सहभागाचा वाटा आणि दलित आणि वंचितांनी विकासाच्या प्रक्रियेत घेतलेला सहभाग पाहिला असता भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊन पहिल्या दोन अर्थव्यवस्थांनासुद्धा आव्हान देण्याच्या तयारीत आहे. कृषी क्षेत्रामध्ये एम.एस. स्वामीनाथन यांनी हरितक्रांतीचे स्वप्न तयार केले होते. त्यांचे हे कृषी विषयक प्रगतीचे आर्थिक सिद्धांत पहिल्यांदा सुब्रमण्यम् यांनी कृतीमध्ये आणले. लाल बहादूर शास्त्राr यांच्या काळात भारतामध्ये पहिली हरितक्रांती झाली. दुसरी झाली आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात चौथ्या हरितक्रांतीच्या तयारीमध्ये आपण आहोत.

या काळामध्ये फळे आणि भाजीपाल्याचे, दुधाचे उत्पन्न हे अन्नधान्याच्या उत्पन्नापेक्षा 2014 पासून वेगाने वाढण्यास सुरूवात झाली आहे आणि कृषी व दुग्ध क्षेत्रातील भारताची ही प्रगती अद्भुत आहे. कोरोना काळातसुद्धा भारताने जगाला जशी लस पुरविली तसे जगाला अन्नधान्यही पुरविले आहे आणि जगाला औषधेही पुरविली आहेत. फार्मा क्षेत्रामध्ये भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर उदयास आला आहे आणि दुध क्षेत्रामध्ये धवलक्रांती करून भारताने जगात सर्वाधिक दूध उत्पादनात पहिला क्रमांक संपादन केला आहे. तेच फळे आणि भाजीपाला या क्षेत्रातसुद्धा घडत आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक प्रगतीचा हा भक्कम पाया हे आमच्या 75 वर्षातील स्वातंत्र्याचे खरे यश आहे. कार उत्पादन क्षेत्रातही भारत 3 वरून दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तापद मिळविल्यानंतर भारतामध्ये पहिली गोष्ट कोणती केली असेल तर त्यांनी अहमदाबाद या ठिकाणी पायाभूत विकास संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या आधारे विविध क्षेत्रामध्ये आपणास पायाभूत सुविधांच्या कोणत्या विकासाचे पर्याय उपलब्ध आहेत, कोणते प्राधान्यक्रम आपणास लक्षात घ्यावयाचे आहेत हे ठरविणे त्यामुळे शक्य झाले. 10 वर्षात भारताने विकासाचा वेग 7.5 टक्क्याच्या वर नेला आहे जगातील मोठमोठ्या आर्थिक संस्थांनीसुद्धा भारताकडे पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

                         प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

Advertisement
Tags :

.