नवभारताच्या दिशेने...
जगभर आपल्या लोकशाही शासन पद्धतीने नवा मापदंड निर्माण करणारा आपला भारत देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहे. हा सात, साडेसात दशकांचा टप्पा देशातील प्रत्येक नागरिकासाठी निश्चितच अभिमानास्पदच म्हणायला हवा. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आत्तापर्यंत भारताने काय कमावले, काय गमावले, याचे तटस्थपणे मूल्यमापन केल्यास नवभारताच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे, असे आज निश्चितपणे म्हणता येईल. वास्तविक, भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा जगाच्या इतिहासातील एक क्रांतिकारक लढा मानला जातो. नैतिक मूल्यांची बैठक, हेच त्याचे कारण होय. सत्याग्रह, असहकार, सविनय कायदेभंग, अहिंसा असे शब्द वा विचार भारतीय स्वातंत्र्यलढ्याने विश्वाला दिले. लोकमान्यांच्या ‘स्वराज्य मंत्रा’ने मनामनात ठशठशीतपणे स्वातंत्र्यज्योत चेतवली. तर महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ वा ‘करो वा मरो’ या आंदोलनाने देशाच्या कानाकोपऱ्यामधील सामान्यातील सामान्य माणसापर्यंत लढ्याची धग पोहोचवली. याशिवाय नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचे अतुलनीय शौर्य, हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिकारांचे बलिदान, असे या लढ्याचे अनेक पैलू असून, मोठ्या संघर्षातून हा देश भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी परकियांच्या तावडीतून मुक्त केल्याचे आपला इतिहास सांगतो. त्याचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नवभारताचा पाया रचला. तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवभारताची वाट अधिक प्रशस्त केली आहे. देशात अनेक सरकारे आली व गेली. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानपदाची धुराही वाहिली. तथापि, यातील प्रत्येकानेच कमी अधिक प्रमाणात देशाच्या विकासात योगदान दिले, हे प्रांजळपणे कबूल केलेच पाहिजे. पारंतत्र्यातून मुक्त झाल्यानंतर भारतापुढे देश उभारणीचे सर्वांत मोठे आव्हान उभे ठाकले होते. हे हिमालयासमान आव्हान नेहरूंनी सहजगत्या पेलले. त्यांच्या काळात अनेक संस्थांची उभारणी झाली. पायाभूत सुविधा, लोककल्याणकारी योजनांच्या मुहूर्तमेढीबरोबरच लोकशाहीच्या मंदिराची पायाभरणी होण्याचा कालखंडही हाच. अलिप्त वा तटस्थ राष्ट्र म्हणून देशाला वेगळी ओळख कुणी मिळवून दिली असेल, तर ती नेहरूंनीच. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा देत लोकहिताला प्राधान्य दिले. बँकांचे राष्ट्रीयीकरण, हरित क्रांतीसह अनेक महत्त्वाचे टप्पे देशाने इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत पार केले. इतकेच नव्हे, तर बांग्लादेशची निर्मिती करण्यासही त्याच कारणीभूत ठरल्या. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडून आली. विश्वनाथ प्रतापसिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करीत समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 1991 हा तर देशासाठी टर्निंग पॉईंटच म्हटला पाहिजे. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्याच काळात भारताने खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. पंतप्रधान नरसिंहराव व अर्थमंत्री मनमोहनसिंग यांच्या दूरदृष्टीतून आर्थिक महासत्ता म्हणून आपली बीजे जगाच्या नकाशावर रोवली गेली. त्यानंतरचे अटलयुगही संस्मरणीय, विकासात्मक व धोरणात्मक होय. अनेक पक्षांचा समावेश असलेल्या आघाडी सरकारचा कारभार कसा सहमतीने हाकायचा व मतमतांतरातूनही मार्ग काढत देशाला विकासाच्या वाटेवर कशा पद्धतीने न्यायचे, याचे दर्शन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घडवले. पोखरण अणूचाचणी व कारगील युद्धातून त्यांनी आपल्यातील कणखरतेचे घडविलेले दर्शन आजही अनेकांच्या स्मरणात असेल. जगाच्या अर्थकारणाचा सखोल अभ्यास असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात भारताने अर्थशास्त्रात केलेली कामगिरी ही देदीप्यमानच म्हटली पाहिजे. त्यांच्या अर्थनीतीमुळेच देशाला या क्षेत्रात आपले नाव उंचावता आले. 2008-09 च्या जागतिक मंदीत मनमोहनसिंग यांच्या धोरणांमुळेच भारतासारखा देश तगला, हे लक्षात घेतले पाहिजे. मागच्या दहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करीत आहेत. मोदी यांनी आपल्या या दशकभराच्या कारकिर्दीत राम मंदिर, 370 सह अनेक क्लिष्ट मुद्दे सोडविण्यावर भर दिला. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, स्टार्टअप इंडिया, स्वच्छ भारत, आयुष्मान भारत, डिजिटल इंडिया अशा कितीतरी योजना देशाला दिल्या. नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर रस्त्यांचे जाळे विणून पायाभूत सुविधा बळकट करण्यात आल्या. डिजिटल इंडियाने तर देशाचा चेहरामोहराच बदलला असून, मागच्या तीन ते चार वर्षांत देशात डिजिटल क्रांतीच घडून आल्याचे दिसून येते. त्यातून वेळेची व पैशाची बचत होण्याबरोबरच भ्रष्टाचारालाही आळा बसला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. मात्र, तरीही देशातील सर्व प्रश्न आज सुटले आहेत, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. दहशतवाद, नक्षलवादाची तीव्रता कमी झाली असली, तरी आजही या कारवाया थांबलेल्या नाहीत. काश्मीर पुन्हा धुमसू लागले आहे. अनिर्बंध विकासामुळे अनेक प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. पुणे, केरळ, उत्तराखंडमधील आपत्ती असेल किंवा देशातील वेगवेगळ्या शहरांना पुराने घातलेला विळखा असेल. याने नवीन आव्हाने उभी केली असून, त्याला नव्याने उत्तरे शोधावी लागतील. यंदाही ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविला जात आहे. मात्र, हा उपक्रम राबविताना प्रत्येकाने जबाबदारीचेही भान ठेवले पाहिजे. नियम शिथिल झाले म्हणून बेजबाबदार वृत्तीचे दर्शन घडविणे चुकीचे आहे. मागच्या वेळी अनेकांनी तिरंगा घरावर फडकविला खरा. मात्र, त्याला सन्मानपूर्वक उतरविण्याचे कष्ट घेतले नाहीत. तसे होता कामा नये. राष्ट्रध्वजाचा आदर हा राखला गेलाच पाहिजे. सध्या भारताच्या सीमा अशांत आहेत. पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळसह जवळपास सर्वच देशांमध्ये राजकीय उलथापालथी सुरू आहेत. हे पाहता भारताला कायम सावध रहावे लागेल. नवभारताच्या दिशेने सुरू असलेला आपला प्रवास निर्णायक टप्प्यावर असून, तो तडीस नेणे, हेच आपले लक्ष्य असेल.