महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहतूक कोंडीतून गोंयकारांची होवो मुक्तता!

06:03 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा म्हटला म्हणजे पर्यटकांचे हक्काचे स्थान. सध्या निसर्गसंपन्न अशा गोवा राज्यात सध्या अपघातांच्या मालिका चालू आहेत. तसेच वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. गोवा राज्यात सध्या महोत्सवांची धामधूम सुरू असल्याने साहजिकच देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ सुरू आहे. तसेच बहुतांश पर्यटक वाहनाने प्रवास करीत असल्यामुळे सध्या गोव्यातील रस्तेही अपुरे पडत आहेत. मुख्य पणजी राजधानीबरोबरच किनारी भागातील रस्तेही वाहनांनी फुल्ल असून सर्वसामान्यांना प्रवास करणे जिकिरीचे बनले आहे. तसेच गोंयकारांचा वाहतूक कोंडीमुळे श्वास गुदमरतोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यातून गोमंतकीयांची मुक्तता होणे गरजेचे आहे.

Advertisement

गोवा राज्य म्हटले म्हणजे अनेक पर्यटकांची पावले याठिकाणी वळतात. समुद्रकिनारी कॅसिनो संस्कृतीमुळे तसेच विविध महोत्सव व परिषदांची मांदियाळी यामुळे अनेक महनीय व्यक्तींची याठिकाणी वर्दळ पाहायला मिळते. त्यातल्या त्यात बहुतांश पर्यटक ‘रेन्ट अ बाईक’चा अवलंब करीत असल्याने तसेच स्वत:ची वाहने आणत असल्याने गोवा राज्यातील बहुतांश रस्ते वाहनांनी फुल्ल असतात. यामुळे कामानिमित्त जाणारे अनेकजण अडकून पडतात. तसेच रुग्णवाहिकाही यात अडकून पडत असल्याने वाहतूक कोंडी जणू सर्वसामान्य गोंयकारांच्या पाचवीला पूजलेली आहे, असे म्हणावे लागेल.

Advertisement

राज्यात अलीकडच्या काळात रस्ते अपघातांचे प्रमाण भरमसाठ वाढलेले आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे. दररोज अपघात होऊन कोण ना कोण दगावल्याच्या बातम्या येत असतात. रस्ते अपघातांना अनेक कारणे असतात. गोव्यात वाहनांची संख्या अतोनात आहे व दररोज नव्या वाहनांची सतत भर पडत असते. गोव्याच्या 15 लाख लोकसंख्येच्या सध्या राज्यात जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत. त्यामानाने रस्त्यांचे जाळे व रूंदी वाढलेली नाही. म्हणून अरूंद रस्त्यावर जशी वाहन संख्या वाढते तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते आहे.

उत्तर गोव्यातील सर्वात वर्दळीचा मानल्या जाणाऱ्या पर्वरी-पणजी मार्गावर सध्या वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. राज्यातील सर्वाधिक व्यस्त महामार्गांपैकी एक बनलेल्या या पर्वरी-म्हापसा मार्गावरील सध्याचीच वाहतूक हाताळताना पोलिसांना नाकीनऊ येतात. म्हापसा-पणजी मार्गावरील चढण धोकादायक ठरत आहे. अनेक अवजड वाहने त्या चढणीवर अडकून पडतात आणि वाहतुकीची कोंडी होते. सातत्याने हे प्रकार घडत असल्याने प्रवासी त्रासले आहेत. बस्तोडा ते पर्वरी या साधारण साडेपाच किलोमीटर रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ वाढली आहे की, उ•ाणपूल हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर उ•ाणपूल बांधण्याची तयारी सुरू झाली आहे. होऊ घातलेल्या या नवीन फ्लायओव्हर महामार्गाच्या बांधकामाला प्रारंभ झाल्यानंतर स्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता गृहित धरून या महामार्गासाठी पर्यायी दोन रस्ते निर्माण करण्याचा विचार बांधकाम खात्याने चालविला आहे.

राज्य सरकारने पर्वरीत उड्डाणपूल उभारण्यासाठी राजस्थान येथील राजेंद्र सिंग भांबू इफ्रा या कंपनीला ऊ. 364 कोटींच्या कामाचे कंत्राट बहाल केले आहे. त्याचे काम लवकरच प्रारंभ होणार आहे. त्या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीवर ताण वाढून लोकांची गैरसोय होणार आहे. त्यासाठी पर्यायी महामार्ग निर्माण करणे हाच एकमेव पर्याय राहणार असल्याने त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याने तयारी चालविली आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून दोन रस्ते निर्माण करण्यात येणार असून त्यापैकी एक रस्ता सुकूर भागातून जाणार आहे. दुसरा रस्ता चोगम मार्गाजवळून जाणार आहे. काम 2024 च्या सुरुवातीला सुरू होईल बहुधा.

एका पाहणीनुसार पर्वरी भागातून सध्या रोज किमान 40 हजार वाहने ये-जा करतात. यावरून या रस्त्याचा किती वापर होतो त्याचा अंदाज येतो. अशावेळी नवीन फ्लायओव्हरसाठी रस्त्याच्या बांधकामासाठी खोदकाम, बांधकाम साहित्य, अन्य यंत्रणा आणि कामगारांची वर्दळ सुरू होईल, तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे. त्यासाठीच नवीन पर्यायी रस्त्यांची गरज अधोरेखित झाली असून हाच त्यावर एकमेव उपाय ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच बांधकाम खात्याने दोन रस्त्यांचे पर्याय निवडले आहेत.

परिस्थिती अशी असली तरीही ही योजना वाटते तेवढी सोपी नाही. कारण ज्या भागात सध्या रस्ते नाहीत, अशा जमिनीत हे रस्ते निर्माण करावे लागणार असून त्यासाठी संबंधित जमीन मालकांची परवानगी मिळविणेही आवश्यक ठरणार आहे. सुकूर भागातून येणारा रस्ता पर्वरी साई सर्व्हिसजवळ मुख्य मार्गाला जोडला जाणार आहे. कुठ्ठाळीत झुवारी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असताना ज्याप्रकारे अनेक ठिकाणी हंगामी पर्यायी रस्ते बनविण्यात आले होते, त्याच धर्तीवर पर्वरी भागात हे पर्यायी रस्ते बनवावे लागणार आहेत.

सध्या पर्वरी-म्हापसा महामार्गावर दुपदरी लेनमधून वाहतूक चालते. त्याशिवाय या भागात सांगोल्डामधून वाहतूक करण्यासाठी अन्य दोन लेन उपलब्ध आहेत. आता उभारण्यात येणारा नवीन फ्लायओव्हर या महामार्गावरच उभारण्यात येणार असून तो सहा पदरी असेल. डेल्फिनो सुपरमार्केटपासून प्रारंभ होऊन पर्वरीतील जुन्या मार्केटपर्यंत बांधण्यात येणार आहे. या फ्लायओव्हरचे बांधकाम दोन वर्षात पूर्ण होईल, असा अंदाज संबंधित बांधकाम कंपनीने वर्तविला आहे. उ•ाणपुलामुळे पर्वरीमधील महामार्गावरील गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

सरकारने तज्ञ, सरकारी अधिकारी आणि इतरांसोबत विचारमंथन सत्र आयोजित करण्याची आणि जनतेची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने वाहतूक योजना तयार करण्याची हीच वेळ आहे. उड्डाणपूल गरजेचा आहे परंतु सरकारने प्रवाशांना त्यांची कोणतीही चूक नसताना त्रास देऊ नये.

गोव्यात आतापर्यंत अनेक महोत्सव, परिषदा झालेल्या आहेत अन् यापुढेही होणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत तर नववर्षाला निरोप देण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होतील. साहजिकच किनारी भागात,

हॉटेल्समध्ये विविध पार्ट्या रंगणार अहेत. भरीसभर म्हणून ख्रिश्चनबांधवांचा ख्रिसमस उत्सवही आहे. ‘सनबर्न’ही होऊ घातलेला आहे. त्यामुळे साहजिकच रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढणार आहे. रस्ते वाहनांनी फुलून जाणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, अपघात रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना आखणे, गोवा सरकारचे कर्तव्य ठरते. अन्यथा रात्र वैऱ्याची आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. सध्या नियोजनाचा अभाव दिसत असून वेगवेगळ्या कारणास्तव रस्ता खोदाई करून गोवा जर्जर बनला आहे. सध्या गोमंतकीय तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत आहेत. यातून त्यांची सुटका करणे आवश्यक आहे. गोंयकारांना मोकळा श्वास लाभण्याची गरज आहे. त्यादृष्टीने गोवा सरकारने पावले उचलणे आवश्यक ठरते.

राजेश परब

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article