For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मबंधनातून मुक्त होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे

06:22 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्मबंधनातून मुक्त होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

फळाशिवाय कर्म करायचा विचार मनात आणणं आणि त्याबरहुकूम कर्म करणं ही आव्हानात्मक बाब आहे कारण गेले कित्येक जन्म आपण फळाच्या अपेक्षेने कर्म करत आहोत. त्यामुळे फळाची अपेक्षा करणे हा आपला स्वभाव बनला आहे. अर्थात बाप्पा हे जाणून आहेत. म्हणून फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचं महत्त्व समजाऊन सांगताना ते म्हणाले, कर्म करत असतानासुद्धा फळाचेच विचार त्याच्या डोक्यात असल्याने कर्म करत असताना आवश्यक असलेली एकाग्रता त्याला साधता येत नाही. त्यामुळे तो कौशल्याने कर्म करू शकत नाही. जमेल तसं कर्म केल्यावर अपेक्षित फळ मिळालं तर त्याला आनंद होतो आणि जर मिळालं नाही तर तो दु:खी होतो. बरं अपेक्षित फळ मिळालं तर त्यावर संतुष्ट न होता आणखीन काय केलं म्हणजे याहून जास्त फलप्राप्ती होईल असा विचार सुरू होतो.

एकूण फळाची अपेक्षा करून कर्म करणारा मनुष्य समाधानी होणं कठीण असतं. त्यातूनही समजा एखाद्याने मिळालेलं फळ आनंदानं स्वीकारलं तरी तो आनंद तात्पुरता असतो कारण त्या फळातलं नावीन्य संपलं की, आनंद ओसरतो आणि मनुष्य नाराज होतो. एकूण काय फळ मिळालं तरी दु:ख आणि मिळालं नाही तरी दु:ख अशी अवस्था कर्मफळाच्या अपेक्षेनं कर्म करणाऱ्याच्या वाट्याला येते हे नक्की आहे. म्हणून निरपेक्षतेनं जो कर्म करतो तो सदैव म्हणजे कर्म सुरू करताना, कर्म करत असताना आणि कर्म करून झाल्यावरही सुखी असतो कारण अपेक्षाभंगाचं दु:ख त्याच्या कधीच वाट्याला येत नाही.

Advertisement

एकूण कर्म करून मिळालेल्या फळामुळं आपण दु:खीच होणार अशी खात्री झाली तर मनुष्य मिळालेल्या फळाचा द्वेष करण्याची शक्यता आहे. सुख, दु:ख, राग, द्वेष हे मनाचे विकार आहेत. मनुष्य फळात गुंतला की, ते जोर करतात. ज्या गोष्टीत मनुष्य गुंततो त्या गोष्टीची त्याला ओढ लागते. त्यालाच आसक्ती म्हणतात. आसक्ती टाळण्यासाठी मिळालेल्या फळाचा द्वेष न करणे. फळाचा द्वेष न करणारा आसक्तीरहित निरद्वंद्व संन्यासी सदा सुखी असतो. आपल्या आजूबाजूला असे लोक वावरत असतात. ते नेहमी आनंदित असतात. त्यांची परिस्थिती फार काही चांगली असतेच असे नाही. तरीही ते न डगमगता हसतमुखाने परिस्थितीला तोंड देत असतात. फळाच्या आसक्तीत न गुंतल्यामुळं त्यापासून निर्माण होणारे पाप पुण्य त्याच्या खात्यात जमा होत नाही. त्यांच्या खात्यावर पापपुण्यच नसल्याने ते भोगण्यासाठी त्यांचा पुनर्जन्म होत नाही. अशा पद्धतीने निरपेक्षतेने कर्म करणारा माणूस कर्मबंधनातून मुक्त होतो.

थोडक्यात कर्मबंधनातून मुक्त होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे मोक्ष मिळतो. संन्यास घेणारे लोक घरदाराचा त्याग करतात तर कर्मयोगी कर्म करून मिळणाऱ्या फळाचा त्याग करतात पण दोघांनाही मोक्ष मिळतो असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

वदन्ति भिन्नफलकौ कर्मणस्त्यागसंग्रहौ ।

मूढाल्पज्ञास्तयोरेकं संयुञ्जीत विचक्षण ।। 4 ।।

अर्थ-कर्मत्याग व कर्मयोग हे भिन्न फले देणारे आहेत असे मूर्ख व अल्पज्ञ म्हणतात. शहाण्या मनुष्याने त्यांपैकी एकाचा अवलंब करावा.

विवरण-काही लोकांना कर्मत्याग व कर्मयोग वेगवेगळे वाटतात कारण त्यांनी दोन्हीबद्दल नीट समजून घेतलेलं नसतं. वास्तविक पाहता कर्मत्याग करून संन्यास घेणाऱ्या व्यक्तीने कर्मत्याग केलेला नसून फळाचा त्याग केलेला असतो तर कर्मयोगी व्यक्ती कर्म करते पण फळाची अपेक्षा करत नाही. अशा पद्धतीने दोघेही कर्म करून फलत्याग करतात. साहजिकच दोघांनाही कोणतीही अपेक्षा नसल्याने मोक्ष मिळतो पण यातील कर्मसंन्यास आचरायला जास्त अवघड आहे. त्यामानाने कर्मयोग सोपा आहे हे सर्व जो समजून घेईल त्याला योग कळला असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.