महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वातंत्र्य, समानता ही लोकशाहीची देणगी

11:15 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे मानवी साखळी उपक्रमात गौरवोद्गार : लोकशाही दिनाचे उत्साहात आचरण

Advertisement

बेळगाव : विविधतेत एकता जपणाऱ्या आपल्या देशाचा अभिमान वाटतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व पायाभूत हक्कांचे रक्षण करणारी प्रशासकीय व्यवस्था हाच लोकशाहीचा आत्मा आहे, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात रविवारी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. या कार्यक्रमात भाग घेऊन पालकमंत्र्यांनी संविधानाच्या उद्देशिकेला पुष्प वाहून नमन केले. संपूर्ण राज्यात झालेल्या मानवी साखळीच्या उपक्रमात बेळगावकरांनीही भाग घेतला होता. रामदुर्गपासून कित्तूरपर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली होती. सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कार्यक्रमात राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे महत्त्व सांगितले.

Advertisement

आमची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकशाही ताकद देते. स्वातंत्र्य, समानता व न्यायासाठीच्या आकांक्षा पूर्ण करणारी ती शक्ती आहे. जगात भारत बळकट लोकशाही व्यवस्था अस्तित्वात असणारा देश आहे. या व्यवस्थेचा मूळ आधारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आहे. जागतिक पातळीवर 15 सप्टेंबर हा लोकशाही दिन म्हणून आचरण्यात येतो, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. लोकशाहीचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ज्या देशात लोकशाही नाही, त्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था अंमलात आणण्यासाठी पाठपुरावा करणे हाच आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा उद्देश आहे. राज्यात लोकशाही दिनाचे औचित्य साधून 2 हजार 500 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात रामदुर्गपासून कित्तूर तालुक्यातील तेगूरपर्यंत 145 किलोमीटरची मानवी साखळी यशस्वी झाल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, मानवी मूल्यांचे जतन करण्याची शिकवण देणारा हा कार्यक्रमच प्रेरणादायी आहे. संपूर्ण जग या मानवी साखळीमुळे कर्नाटकाकडे पाहते, याचा आपल्याला अभिमान वाटतो. संविधानामधील मानवी मूल्यांचे प्रत्येकाने जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी व शाळकरी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शवला.

अनेक ठिकाणी विस्कळीतपणा

जिल्ह्यात 145 किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. बेळगाव शहरात शिंदोळी क्रॉसपासून सुवर्ण विधानसौधपर्यंत ही साखळी होती. भाजी मार्केटपर्यंत यामध्ये सलगता होती. त्यानंतर अनेक ठिकाणी विस्कळीतपणा दिसून आला. मानवी साखळीत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना दूध व अल्पोपाहार पुरविण्यासंबंधी चर्चा झाली होती. मात्र, तो पुरविण्यात आला नाही. वाहनांची व्यवस्था करण्यातही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article