कर्नाटकाच्या जोखडातून आम्हाला मुक्त करा
मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकच्या जोखडामध्ये असलेला मराठीबहुल सीमाभाग लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये सामील करावा, यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने खासदार छत्रपती शाहू महाराज यांना निवेदन देण्यात आले. ज्योती महाविद्यालय येथे एका कार्यक्रमासाठी शाहू महाराज आले असताना मध्यवर्तीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
संपूर्ण सीमाभाग कर्नाटकच्या कानडी वरवंट्याखाली सापडला आहे. दिवसेंदिवस कन्नडसक्ती अधिक प्रमाणात तीव्र केली जात आहे. त्यामुळे येथील मराठी जनतेला जीवन जगणे अवघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे दुकानांवरील फलकांवर कन्नडची सक्ती केली जात आहे. यामुळे व्यवसाय करणेही अवघड झाले आहे. तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करून येथील जनतेला न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
लोकसभेमध्ये येथील मराठी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता तुम्हीच आवाज उठवावा, अशी विनंती करण्यात आली. त्यावर छत्रपती शाहू महाराज यांनी निश्चितच केंद्रात मी आवाज उठवू. याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील तुमची कळकळ पटवून देऊ. त्यांनाही लक्ष वेधण्यासाठी भाग पाडू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अॅड. राजाभाऊ पाटील, अॅड. एम. जी. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य रावजी पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, शुभम शेळके, मनोहर संताजी, लक्ष्मण होनगेकर, अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. अमर यळ्ळूरकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.