शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे
कोल्हापूर / दीपक जाधव :
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत असुन सर्व शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्यामुळे राज्यातील दृष्टीदोष असलेल्या शालेय मुलांना आता मोफत चष्मे मिळणार आहेत.
केंद्राच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून आरबीएसके अंतर्गत शहर, ग्रामीण भागातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके, मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. यामध्ये अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून 2 वेळा व शाळेतील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची 1 वेळा आरोग्य तपासणी केली जाते. आरोग्य तपासणी करून त्यांच्यामध्ये आढळणाऱ्या जन्मत: असणारे व्यंग, आजार, जीवनसत्वाची कमतरता, दिव्यांगत्वाचे निदान करून वेळेवर उपचार केले जातात. यासाठी शासनाकडून जिल्हास्तरावर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. या प्रत्येक पथकास वाहन, औषधे, तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येते. राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये शिकण्राया मुलांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण वाढत असून या दृष्टीदोषाबाबत उपचाराची आवश्यकता आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून शालेय विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली जाते, राज्यातील शालेय मुलांमध्ये दृष्टीदोषाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुलांच्या वाचन, लिखाण व अभ्यास आदी शालेय प्रगतीवर विपरित परिणाम होत असल्यामुळे मुलांमधील दृष्टीदोषाचे वेळीच निदान करून त्यांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शैक्षणिक सुधारण होऊन शकते.त्या दृष्टीने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून शास्त्राrय पद्धतीने प्रमाणित केल्यानुसार त्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा कार्यक्रम राज्य शासनाची नवीन योजना म्हणून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय मुलांची आरोग्य तपासणी करताना दृष्टीदोष असलेल्या मुलांचा शोध घेणे, दृष्टीदोष असलेल्या मुलांचे त्यांच्याच शाळेत नेत्र सहायकांमार्फत निदान निश्चित करणे व विद्यार्थ्यांना चष्मा मोफत देणे, शालेय मुलांमधील दृष्टीदोष निवारणासाठी त्यांना मोफत चष्मा पुरविण्याच्या नवीन योजनेस सरकारने मान्यता दिली आहे.सन 2024-2025या अर्थसंकल्पीय अधीवेशनात 79 लाखाची तरतूद शासनाने केली आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ३ हजार २३१ विद्यार्थ्यांत दृष्टिदोष
आरबीएसके अंतर्गत कोल्हापूर शहर व ग्रामीण भागातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. यामध्ये अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांची वर्षातून 2 वेळा व शाळेतील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची 1 वेळा आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजारी बालके व मुलांना योग्य ते उपचार, शस्त्रक्रिया यासाठी सामंज्यस करार झालेल्या सर्वसोयीनियुक्त मोठया खाजगी रुग्णालयात पाठवण्यात येते व पालकांना मार्गदर्शन आणि शस्त्रक्रियेचा पाठपुरावा करण्यात येतो.गेल्या वर्षात जिल्हामध्ये 3231 मुलांच्या मध्ये दृष्टिदोष आठळला असुन त्यातील 1692 मुलांना चष्मा लागला आहे.तर 316 मुलांवर तिरळेपणा, 30 मुलांवर मोतीबिंदू,29 मुलामध्ये पापणीचे दोष, 10 मुलामध्ये डोळ्यातील मांस वाढणे व 4 मुलांमध्ये फुल पडण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यासाठी शासनाने 20 लाखाहून अधिक खर्च केला आहे.
- तळागाळातील रूग्णांनी लाभ घ्यावा
आरबीएसके वैद्यकिय पथकांकडून तपासणी करण्यात येणारी मुलेही सामान्य कुटुंबातील असतात. काही मुलांना जन्मत: किंवा काहींना लहानपणापासूनच विविध आजाराने ग्रासलेले असते. अशावेळी ते आजार मुलांच्या आई-वडिलांच्या लक्षात येत नाहीत किंवा आले तरी त्याच्या उपचारासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती नसते. आरबीएसकेकडे समाजातील शेवटच्या घटकातील मुलांना आरोग्य सुविधा पुरविणारा कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या योजनेचा तळागळातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा.
- डॉ.सुप्रिया देशमुख जिल्हा शल्यचिकीत्सक, कोल्हापूर