लोककल्पतर्फे कणकुंबी येथील महिलांसाठी शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे पंख इंडिया फौंडेशनच्या साहाय्याने कणकुंबी (ता. खानापूर) येथील महिलांसाठी शालेय पिशवी शिवणासंबंधीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नोव्हेंबर 17 व 18 रोजी दोन दिवस चाललेल्या या उपक्रमातून महिलांना शिवणकामाचे प्रत्यक्ष कौशल्य प्राप्त करून देण्यात आले. यावेळी त्यांना शालेय बॅग व इतर शिवण साहित्य तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामुळे ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराची निर्मिती झाली आहे. प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल कणकुंबी येथील महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असून आर्थिक स्वावलंबनास हातभार लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. लोककल्पतर्फे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास व रोजगाराभिमुख उपक्रम यापुढेही राबवत राहणार असल्याचे सांगण्यात आले.