विट्यात मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबीर! नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांची माहिती
विटा प्रतिनिधी
येथिल ग्रामीण रुग्णालयात 1 फेब्रुवारी ते ०४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया तसेच दंतरोग उपचार शिबिर व आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी केले आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ०१ फेब्रुवारी ते ०४ फेब्रुवारी या कालावधीमध्ये ग्रामीण रुग्णालय, विटा येथे सर्व रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया व दंतरोग आरोग्य शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. शिबीराचे उद्घाटन आणि आरोग्या विषयीच्या माहितीचे प्रदर्शन दि. ०१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.
या शिबीरामध्ये दि. ०१ फेब्रुवारी रोजी प्राथमिक रुग्ण तपासणी व ग्रामीण रुग्णालय विटा येथे करता येण्यासारख्या शस्त्रक्रिया होतील. त्याचबरोबर दंत उपचार करणेकरिता पात्र लाभार्थ्यांची पुर्वतपासणी करणेत येईल. ०2 फेब्रुवारी आणि ३ फेब्रुवारी रोजी सदर पात्र तसेच संदर्भित रुग्णावर शस्त्रक्रिया व दंत उपचार करणेत येतील. ०4 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांचा पाठपुरावा करणेत येणार आहे. उर्वरित पात्र शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे करणेत येतील, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.
शिबिरात तज्ञांमार्फत मोफत तपासणी व उपचारकेले जाणार आहेत. शिबिरात उपलब्ध मोफत औषधोपचार करण्यात येतील. शक्य त्या सर्व मोफत शस्त्रक्रियाहोतील. शिबिरात रक्त, लघवी आदी तपासण्या मोफत करण्यात येतील. या कालावधीत आरोग्य प्रदर्शन व माहिती देण्यात येणार आहे. शिबिरात दंतरोगावर मोफत उपचार व शस्त्रक्रियाहोणार आहेत. या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह भा. कदम यांनी केले आहे.