लोककल्प फौंडेशनतर्फे माण गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन आणि सेंट्राकेअर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी खानापूर तालुक्मयातील माण गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे 50 हून अधिक गावकऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी गावकऱ्यांना आरोग्य तपासणी, सल्लामसलत तसेच आरोग्य जनजागृतीविषयक मार्गदर्शन केले. सेंट्राकेअर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शिवलीला माळी, नर्सिंग कर्मचारी भावना, सौम्या, जयश्री व एम. बी. मोदगी यांनी वैद्यकीय सेवा दिल्या. लोककल्प फाउंडेशनतर्फे अनंत गावडे व संदीप पाटील यांनी समन्वयाचे काम पाहिले. हा उपक्रम लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा उद्देश होता. शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी लोककल्पचे आभार मानले.