लोककल्प फौंडेशनतर्फे ‘चोर्ला’ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : लोककल्प फौंडेशन आणि केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने चोर्ला (ता. खानापूर) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा होता. चोर्ला गावातील जवळपास 50 हून अधिक गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी आयुर्वेदिक उपचार तसेच आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या डॉ. सोनाली कोंकेरी, डॉ. प्रसाद बवडकर, दीपनंद भारकड, गणेश घवाटे, पीआरओ श्रीधर, नारायन आर. यांनी सहभाग घेतला. लोककल्प फौंडेशनतर्फे अनंत गावडे, संदीप पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण नागरिकांना मूलभूत आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगाराच्या संधी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे ध्येय आहे. या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल गावकऱ्यांनी लोककल्प व केएलई आयुर्वेदिक हॉस्पिटलचे मन:पूर्वक आभार मानले.