फेक साईटवरुन ब्रॅंडेड वस्तू विक्रीतून फसवणुकीचा फंडा
कोल्हापूर / विशेष प्रतिनिधी :
यापूर्वी फक्त सणानिमित्त ऑनलाईन बाजारपेठेत ग्राहकांवर ऑफर्सचा भडीमार होत असे. आता मात्र अनेक आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये ग्राहक कॅश करण्यासाठी स्पर्धाच रंगली. मात्र, या गर्दीत अनेक फेक कंपन्यांची ‘दुकानदारी’ सुरू झाली आहे. आकर्षक किंमतीला ब्रॅंडेड वस्तू देऊन ग्राहकांचा डाटा घेतला जातो. त्यानंतर बक्षीस लागल्याची बतावणी करुन सावज हेरण्याचा प्रयत्न होत आहे. फसवणूक टाळण्यासाठी फेक साईट ओळखून अशा खरेदीपासून लांब राहिले तरच फसवणूक थांबणार आहे.
कोरेना काळात दिर्घ काळ घरीच थांबल्याने अनेकांचा नेटसर्फींग हे टाईमपास बनले. वाढलेला क्रिनटाईम तसाच पुढे कॅरिऑन झाला. सोशल डिस्टन्सिंगमुळे दुकाने, मॉल बंद.. ग्राहक घरी, यामुळे बाजारपेठेत उलाढाल ठप्प झाली होती. त्यावर उपाय म्हणून अनेक नामांकित कंपन्यांनी ऑनलाईन शॉपिंग अन् होम डिलीव्हरीसाठी मोबाईल अॅप अद्ययावत केले. ग्राहकांकडूनही विंडो शॉपिंग अन् त्यातून डिस्काऊंटच्या शोधात नेट सफरींगचे प्रमाण वाढू लागले. कोरोना संसर्ग गेला तरी ही सवय कायम आहे.
गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी निमित्त ग्राहकांना विशेष सवलतींचा ऑनलाईन बाजारात अक्षरश: भडीमार होत असे. सण नसतानाही अनेक नामांकित ब्रॅंडचे कपडे 50 ते 80 टक्के डिस्काऊंटवर ऑनलाईन उपलब्ध होत असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने त्याकडे आकृष्ट होत आहेत. ग्राहकांचा कल पाहून अनेक फेक कंपन्यां मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचल्या आहेत.
नामांकित ब्रॅब्राँडच्या खरेदीवर या कंपन्यांकडून दिली जाणारी सुट चक्रावून सोडणारी आहे. 200 ते 500 रुपयांत ब्रॅंडेड कपडे आणि इतर वस्तूंची प्रामाणिक डिलिव्हरी करुन पहिल्या टप्प्यात या कंपन्या ग्राहकांचा विश्वास संपादन करतात. अगदीच नाममात्र किंमतीत वस्तू देण्यामागे या कंपन्यांचे दुसरेच गणित असल्याचे आता पुढे येऊ लागले आहे.
ऑर्डर केलेली वस्तू कशी आहे? आवडली काय? असा कस्टमर केअर सेंटरकडून कॉल करुन ग्राहकांशी संवाद साधला जातो.
त्यानंतर दोन दिवसांनी आपण केलेल्या खरेदीवर काढलेल्या लकी कुपनमध्ये आपणास काही लाख रुपयांचे बक्षीस लागले आहे. ते नको असेल कर चारचाकी गाडीचा पर्याय असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात कागदपत्रे मागवली जातात. त्यांनतर बँक खाते देऊन काही ठराविक रक्कम भरण्यास सांगितली जाते. अशा कॉल्सना भुलून अनेकांनी 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत रक्कम पाठवून फसगत करुन घेतली आहे. किरकोळ रक्कम असल्याने पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने फेक कंपन्यांची दुकानदारी जोरात सुरु आहे. अशा फेक कॉल्स आणि फेक साईटवरील खरेदीपासून सावध राहण्याची गरज आहे.
खरबदारी हाच उपाय
फेक कंपन्याची वेबसाईट आणि अॅप मोबाईलमध्ये ओपन आणि डाऊनलोड करु नका. नामांकित कंपन्यांकडूनच ऑनलाईन खरेदीला प्राधान्य द्यावे. फेक कंपनीकडून येणाऱ्या कॉल्सना उत्तरे देणे टाळा. कसलीही वैयक्तिक माहिती शेअर करु नका. तत्काळ पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार करा, खबरदारी हाच उपाय असल्याचे असे तज्ञांचे मत आहे.