Solapur Crime News : दोन कोटींची फसवणूक करणारा भोंदूबाबा जेरबंद
घरामधून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून जादूटोणेचा प्रकार
सोलापूर : सोलापूर जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे म्हणून १ कोटी ८७ लाख ३१ हजार ३०० रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मोहम्मद कादरसाब शेख ऊर्फ साहेब ऊर्फ महाराज (वय ४०) असे फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव आहे. याबाबत गोविंद मल्लिकार्जुन वंगारी (रा. सोलापूर) यांनी फसवणूकबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडेही तक्रारी अर्ज केला होता.
यात गोविंद वंगारी यांना राहत्या घरामधून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला. त्यासाठी वंगार यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ८७लाख ३१ हजार ३०० रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली.
याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी अर्जाची चौकशी करून संबंधित भोंदू बाबा विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी चार तपास पथके रवाना केली होती.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांच्या तपास पथकाला यातील आरोपी हा कर्नाटक राज्यात विजापूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मात्र निश्चित पत्ता मिळाला नाही.
त्यानंतर गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तपास पथकासह कर्नाटकातील विजापूर येथे जाऊन आरोपी कादरसाब शेख याला आदिलशाही नगर जर्मन बेकरी जवळ जाऊन त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.