जादा परताव्याच्या आमिषाने ६ लाखांची फसवणूक! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूणास अटक
उचगाव वार्ताहर
जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तरूणास अटक केली आहे. प्रमोद धोंडी धुरी (वय 39, मूळ रा. मोरे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, सध्या रा. मस्के निवास, न्यू दत्त कॉलनी, सरनोबतवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. रेणुका सूर्यकांत बगाडे यांनी गांधीनगर पोलिसात फिर्याद दिली.
गांधीनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रमोद धुरी हा सरनोबतवाडी येथील मस्के यांच्या घरी भाडेकरू आहे. धुरी याने नजीकच राहणाऱ्या रेणुका सूर्यकांत बगाडे (वय 36, रा. न्यू दत्त कॉलनी, सरनोबतवाडी) यांच्यासह इतर काही जणांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. जुलै 2024 पासून 9 सप्टेंबरअखेर त्यांच्याकडून सहा लाख दहा हजार रुपयांची रक्कम धुरीने घेतली. त्यानंतर केवळ तीस हजार रुपये बगाडे व इतरांना धुरी याने परत केले. जादा परतावा व मुद्दल रकमेबद्दल वारंवार धुरी याच्याकडे तगादा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बगाडे यांच्या लक्षात आले. याबाबत बगाडे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावऊन धुरी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.