कर्जाचे आमिष दाखवून 2 कोटी 19 लाखांची फसवणूक! बिरणवाडी येथील साखर व्यावसायिकांची चौघा विरूध्द फिर्याद
तासगाव प्रतिनिधी
विश्वास संपादन करून, फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यासाठी घेतलेली रक्कम परत न करता तासगाव तालुक्यातील बिरणवाडी येथील एका साखर व्यावसायिकांची तब्बल 2 कोटी 19 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून चौघाविरूध्द तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिपक नेताजीराव मोरे, रा. बिरणवाडी ता. तासगांव यांनी शिरीषकुमार देशपांडे, श्रीकांत चव्हाण, सोनल देशपांडे, सूर्यकांत नंदकिशोर शर्मा, सर्व रा. अरूणराव देशपांडे, प्लॅट नं-14, बिल्डींग नं. सी डी 63, श्रीरंग रोड, मातृछाया बंगलो समोर, श्रीरंग रोड, ठाणे यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी यांची स्वत:ची कृषीरत्न सेल्स अॅन्ड कार्पोरेशन सरस्वती नगर वासुंबे, ता. तासगांव, जि. सांगली या नावाची ट्रेडींग कंपनी आहे. तिचे कार्यालय वासुंबे येथे असून या कंपनी मार्फत ते विविध साखर कारखान्याकडून साखर खरेदी करून ती बाजारामधील विविध डिलरना विक्री करतात.
फिर्यादी व्यवसाय करताना जानेवारी 2023 मध्ये श्रीकांत चव्हाण, शिरीषकुमार देशपांडे, यांची ओळख फिर्यादींचा मित्र अक्षय पाटाल रा. वायफळे, ता. तासगांव यांच्यामार्फत झाली. त्यावेळी त्यांनी विविध फायनान्स कंपन्यामध्ये ओळख असून त्यांनी मार्केटमधील मोठ-मोठया कंपन्यांना कर्ज मंजूर करून देण्याचे काम केले आहे. असे सांगून कर्ज मंजूर करण्याकरिता ते कर्ज मंजूर करण्यापूर्वी व नंतर ठराविक टक्केवारी घेतात असे सांगितले. तसेच जर तुम्हाला कर्ज हवे असेल तर आम्ही ओळखीने लिमीट व्रेडीट, बँक गॅरेंटी देवुन बिझनेस कर्ज मंजूर करून देतो, 100 टक्के कर्ज मंजूर करून देण्याची गॅरंटी आमची तुम्हाला किती कर्ज हवे आहे ते सांगा असे ही ते म्हणाले.
दरम्यान साखर खरेदी करण्यासाठी आर्थिक तुटवडा असल्याने फिर्यादी यांनी कर्ज घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी श्रीकांत चव्हाण, शिरीषकुमार देशपांडे, यांच्याशी संपर्क साधला व कर्ज हवे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना बिझनेस लोन मंजूर करून देतो असे सांगितले. त्यासाठी त्यांना मंजूर होणाऱ्या कर्जाच्या 10 टक्के पैकी 5 टक्के कर्ज मंजूर करण्यापूर्वी व 5 टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर द्यावे लागेल असे सांगितले. त्यास फिर्यादी यांनी होकार दिला. त्यावर बँक खातेवर फिर्यादी यांना पैसे पाठवण्यास सांगितले.
त्याप्रमाणे फिर्यादी यांनी वेगवेगळया खाते वरून एकूण 2 कोटी 26 लाख 100 रूपये त्यांना पाठवले. दरम्यान फिर्यादी यांनी संबंधित कंपनीची ऑनलाईन पध्दतीने जीएसटी पोर्टलवर माहिती घेतली असता कंपनीचे मालक शिरीषकुमार देशपांडे हे नसुन त्यांच्या पत्नी श्रीमती सोनल शिरीषकुमार देशपांडे व सुर्यकांत नंदकिशोर शर्मा हे असल्याचे समजले, तसेच संबधित बँक खातेधारक श्रीमती सोनल शिरीषकुमार देशपांडे असल्याचे समजले.
लोन मंजूरचे बनावट पत्र.....
तद्नंतर फिर्यादी यांनी शिरीषकुमार देशपांडे व श्रीकांत चव्हाण यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता त्यांनी फिर्यादी यांना एस बी आय. अॅक्सीस बँक, डुन व्हॅली फायनान्स अॅन्ड लेझींग लिमीटेड या कंपनीचे लोन मंजूर झाल्याचे मंजुर पत्र दिले. ते पत्र घेवुन फिर्यादी यांनी प्रथम एस बी आय बँक भाईंदर शाखा येथे जावुन चौकशी केली असता तेथील बँक अधिकारी यांनी नमुद पत्र त्यांचे बँक कार्यालयाचे नसून ते बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी अॅक्सीस बँक शाखा चेंबुर येथे जावुन चौकशी केली, दरम्यान फिर्यादी यांच्या लक्षात आले की बनावट मंजुरी पत्र दिले आहे.
त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या पैशाबाबत शिरीषकुमार देशपांडे यांच्याकडे विचारणा करून पैसे परत द्या असे सांगितले. वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आत्तापर्यंत फिर्यादी यांना 7 लाख रूपये 8 मे 2024 पर्यंत टप्याटप्यात परत दिले. तर उर्वरित रक्कम 2 कोटी 19 लाख 100 रूपये बाबत फोन करून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवुन पैसे देण्यास टाळाटाळ केली. तर मे 2024 नंतर माझा त्यांच्याशी संपर्क नाही,त्यावरून माझे लक्षात आले की, माझी फसवणूक झाले आहे, असेही या फिर्यादीत म्हटले आहे.