For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांची फसवणूक

11:06 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांची फसवणूक
Advertisement

हक्काच्या रेशनमध्ये काटामारी, लाभार्थी संतप्त, लक्ष देण्याची गरज

Advertisement

बेळगाव : गोरगरीब जनतेला अन्नभाग्य योजनेंतर्गत मोफत रेशनचा पुरवठा केला जात असला तरी काही रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळत नसल्याचे दिसत आहे. या प्रकाराबाबत सर्वसामान्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांना ठरलेल्या किलोपेक्षा कमी धान्य देऊन माघारी पाठविले जात आहे. त्यामुळे रेशन दुकानदार मजेत व सर्वसामान्य लाभार्थी मात्र चिंतेत असे चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाकडून सद्यस्थितीत माणसी पाच किलो तांदूळ वितरीत केले जात आहेत. मात्र, रेशन दुकानदारांकडून मनमानी सुरू असून अशिक्षित लाभार्थ्यांचे मशीनवर बोटाचे ठसे घेऊन कमी धान्य दिले जात आहे. यामध्ये लाभार्थ्यांची फसवणूक होत असल्dयाचे समोर येऊ लागले आहे. या गैरव्यवहाराला आळावा घालावा, अशी मागणीही होत आहे. जिल्ह्यात 14 लाख 74 हजार 621 इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे. यामध्ये अंत्योदय, बीपीएल आणि एपीएल कार्डधारकांचा समावेश आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना दरमहा 35 किलो, बीपीएल लाभार्थ्यांना 5 किलो व एपीएल लाभार्थ्यांना 15 रु. किलो दराने धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, रेशन दुकानदारांकडून लाभार्थ्यांची वजनात फसवणूक केली जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना कमी धान्य घेऊन मुकाट्याने माघारी परतावे लागत आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समज द्यावी, अशी मागणीही होत आहे. शिधापत्रिका धारकांकडून स्वॅप मशीनवर बोटाचे ठसे घेऊन कमी धान्य दिले जात आहे. रेशन दुकानात पाच किलो प्रति व्यक्तीनुसार 20 किलो तांदूळ मिळणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात 17 किंवा 18 किलो तांदूळच दिले जात आहेत. वजनात घट करत असल्याची प्रकरणे वाढली आहेत. अशावर अंकूश ठेवावा, अशी मागणी आहे.

ग्रामीण भागात फसवणूक

Advertisement

ग्रामीण भागात अशिक्षित लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जात आहे. मात्र प्रत्यक्षात रेशन कमी दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दोन-तीन किलो तांदूळ कमी मिळू लागला आहे. याबाबत रेशन दुकानदाराला विचारल्यास रेशनकार्ड रद्दच्या धमक्या मिळू लागल्या आहेत.

गैरव्यवहार केल्यास कारवाई

गैरव्यवहार करणाऱ्या दुकानदाराबाबत लेखी तक्रार दिल्यास तातडीने त्या दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे. लाभार्थ्यांना योग्य तो धान्याचा पुरवठा झाला पाहिजे. कोणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होणार आहे. बायोमेट्रिक अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य कमी देणे चुकीचे आहे.

- श्रीशैल कंकणवाडी (अन्न व नागरी पुरवठा खाते सहसंचालक)

बीपीएल कार्डसाठी फोफावले एजंटराज : जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज

बीपीएल रेशनकार्ड अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा वेळ देण्यात आला. मात्र जिल्ह्यातून लाखो अर्ज प्रलंबित होते. या दोन दिवसांत त्या अर्जदारांचे ऑनलाईनद्वारे अर्जच स्वीकारता आले नाहीत. जिल्ह्यातून केवळ दोनच टक्के लोकांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. यामुळे रेशन कार्डसाठी एजंटराज फोफावले असून तब्बल 3 ते 4 हजार रुपये जनतेकडून मागणी करत आहेत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे हा फटका बसत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेशनकार्ड वितरण कार्ड प्रक्रिया रेंगाळली आहे. अचानकपणे लिंक दिली जात आहेत. ती लिंक केवळ कर्नाटक वन व ग्रामवन याच ठिकाणी देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी अधिक गर्दी होत असल्याने तसेच सर्व्हरची समस्याही वारंवार होत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. हीच संधी साधत काही एजंट सक्रिय झाले आहेत. सर्व्हर डाऊन याचबरोबर केवळ सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंतच लिंक देण्यात येत आहे. त्यामुळे गोंधळ उडत आहे. केवळ दोन दिवस दिल्यानंतर पुन्हा ती लिंक पुन्हा बंद केली जात आहे. त्यामुळे सरकार जाणूनबुजून हा प्रकार करत असल्याचा आरोप होत आहे. काही ठराविक ऑनलाईन सेंटरनाच ही लिंक दिल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा याबाबत अन्न व नागरी पुरवठा खाते तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सुरू असलेले एजंटराज बंद करावे अशी मागणीही केली जात आहे.

Advertisement
Tags :

.