Sangli News : सांगलीत फायनान्स कंपनीत फसवणूक; 6.62 लाख रुपये गहाळ
सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणूक प्रकरण नोंदवले
सांगली : एका फायनान्स कंपनीत आठ महिन्यातील प्रत्येक आठवड्याला भरण्याकरिता ५७ महिलांनी दिलेले ६ लाख ६२ हजार ५५० रुपये कंपनीत न भरता स्वतःकडेच ठेवणाऱ्या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार एक जुलै २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत सांगलीतील आकाशवाणी केंद्रानजीक असणाऱ्या सुभाषनगर येथे घडला.
शाखा याप्रकरणी भारत फायनार्नसयल इन्कल्युजन लिमिटेडचे व्यवस्थापक हर्षद अजित सुतार (रा. संपत चौक, माधवनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी हर्षद सुतार हे भारत लिमिटेड कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे
कार्यालय सुभाषनगर येथील माऊली बिल्डिंग येथे आहे. सदर कंपनीत संशयित मोनेश शांबकर बडीगर, मायकल बाळू माने (रा. शहापूर, ता. हातकणांगले, जि. कोल्हापूर), रविंद्र विठ्ठल पोवार (रा. कुची, जि. सांगली) आणि सुयोग सुरेश पाटील (रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा) हे कामास आहेत. त्यांच्याकडे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या महिलांकडून आठवड्याला हसा जमा करण्याचे काम आहे.
चौघा संशयितांनी संगनमत करून आठ महिने ५७ महिलांकडून आठवड्याला कंपनीत जमा करण्यासाठी पैसे घेतले. मात्र ते कंपनी कार्यालयात जमा न करता स्वतःकडेच ठेवले. ही रक्कम ६ लाख ६२ हजार ५५० रुपये आहे. ही बाब लक्षात आल्यावर चौघाही संशयितांविरोधात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.