Satara : वालूथ डाक कार्यालयात फसवणुकीचा पर्दाफाश..!
संजय चव्हाण याच्याविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मेढा (ता. जावली) │ वालूथ येथील डाक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संजय गणपत चव्हाण (रा. वालूथ) या पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याविरुद्ध मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर संतराम डोंगरे (वय 37, रा. वाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 19 फेब्रुवारी 2019 ते दि. 26 मार्च 2024 या कालावधीत संजय चव्हाण वालूथ डाक कार्यालयात कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेत 11 खातेदारांकडून बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना आणि मुदत ठेव खात्यांसाठी पैसे स्वीकारले.
मात्र त्याने संबंधित रक्कम शासकीय खात्यात जमा न करता केवळ खातेदारांच्या पासबुकवर खोटी नोंद करून व्यवहार दाखविला. तसेच, काही खातेदारांकडून मुदत ठेव खाते उघडण्यासाठी रक्कम घेऊन बनावट खातेपुस्तिका तयार करून दिली. या गैरव्यवहारातून एकूण ₹6,26,710 रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
सदर अपहारातील सुमारे ₹3 लाख रक्कम आरोपीने शासकीय खात्यात जमा केली असली, तरी उर्वरित ₹3,26,710 रुपये भरण्यास तो टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोस्ट विभाग व खातेदारांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलीस करत आहेत.