फ्रान्स विजयी तर बांगलादेश-कोरिया लढत बरोबरीत
वृत्तसंस्था / चेन्नई
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्व चषक हॉकी स्पर्धेतील फ गटातील झालेल्या सामन्यात फ्रान्सने आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळाच्या जोरावर बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा 8-3 अशा गोलफरकाने पराभव केला. तर या स्पर्धेतील फ गटातील दुसऱ्या एका सामन्यात अमिरुल इस्लामच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर बांगलादेशने कोरियाला 3-3 असे बरोबरीत रोखले.
फ गटातील झालेल्या सामन्यात फ्रान्सने ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत अधिक वेगवान आणि अचूक खेळ केला. सामना सुरू झाल्यानंतर नवव्याच मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर आर्थर मॉरक्रेटीने फ्रान्सचे खाते उघडले. पण फ्रान्सला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 12 व्या मिनिटाला मॅथ्यु हेथॉर्नने मैदानी मैदानी गोल करुन ऑस्ट्रेलियाला बरोबरी साधून दिली. यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी दोन गोल नोंदवून फ्रान्सवर 3-1 अशी आघाडी मिळविली. 22 व्या मिनिटाला पॅट्रीक अॅन्ड्रीव्हने ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोल केला. 28 व्या मिनिटाला इयान ग्रोबलेरने पेनल्टी कॉर्नरवर ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोल केला. 30 व्या मिनिटाला फ्रान्सचा जेम्स लिदार्दने दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने फ्रान्सवर 3-2 अशी आघाडी मिळविली होती.
उत्तराधार्थातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर तिसऱ्याच मिनिटाला फ्रान्सचा तिसरा गोल टॉम गेलार्डने नोंदविला. गेलार्डने ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीतील तिघांना हुलकावणी देत चेंडू अचूकपणे गोलपोस्टमध्ये धाडला. 49 व्या मिनिटाला गॅब्रीयल पिओलीने मैदानी गोल करुन फ्रान्सला 4-3 असे आघाडीवर नेले. 53 व्या मिनिटाला फ्रान्सचा पाचवा गोल हुगो डोलोयुने केला. सामना संपण्यास सात मिनिटे बाकी असताना फ्रान्सने तीन गोल नोंदविले. 58 व्या मिनिटाला मॅलो मार्टिनेकने फ्रान्सचा सहावा तर गेलार्दने फ्रान्सचा सातवा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. डोलोयुने 60 व्या मिनिटाला फ्रान्सचा आठवा गोल करुन ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले.
अमिरुलची हॅट्ट्रीक
फ गटातील झालेल्या सामन्यात बांगलादेशने कडव्या कोरियाला 3-3 असे बरोबरीत रोखत उपांत्यपूर्व फेरीसाठी आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. या सामन्यात बांगलादेशतर्फे अमिरुल इस्लामने हॅट्ट्रीक साधली. अमिरुल इस्लामची या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्ट्रीक आहे. या सामन्यात कोरियातर्फे मीनहेओकने आठव्या आणि 17 व्या मिनिटाला असे दोन गोल तर सनने 13 व्या मिनिटाला गोल केला. बांगलादेशतर्फे अमिरुल इस्लामने 36 व्या, 46 व्या आणि 56 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधत हा सामना बरोबरीत राखला. आता फ्रान्सचा फ गटातील पुढील सामना मंगळवारी बांगलादेशबरोबर तर कोरियाचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होईल.
जपान विजयी
क गटातील झालेल्या सामन्यात जपानने चीनचा 3-2 अशा गोल फरकाने निसटता पराभव केला. जपानचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. तर दुसऱ्या एका सामन्यात अर्जेंटिनाला न्यूझीलंडने 3-3 असे बरोबरीत रोखले. जपान आणि चीन यांच्यातील सामन्यात जपानतर्फे शून हाराने 11 व्या मिनिटाला, शू ओनोने 20 व्या मिनिटाला तर काझुकी टेरेसेकाने 50 व्या मिनिटाला गोल केले. चीनतर्फे निंगने 11 व्या मिनिटाला, झेंगने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
अर्जेंटिना आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडतर्फे जॉन्टी इलमेसने हॅट्ट्रीक साधली. त्याने चौथ्या, 32 व्या आणि 39 व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनातर्फे मॅटो टोरिगेनीने दुसऱ्या मिनिटाला तर ब्रुनो कोरियाने 11 व्याआणि 40 व्या मिनिटाला गोल केले. आता न्यूझीलंड आणि जपान तसेच अर्जेंटिना आणि चीन यांच्यात पुढील लढती होतील.