पॅलेस्टाइनला मान्यता देणार फ्रान्स
सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघात घोषणा करणार मॅक्रॉन
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्स लवकरच पॅलेस्टाइनला एक स्वतंत्र देशाच्या स्वरुपात मान्यता देणार आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी याची घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ महासभेदरम्यान या मान्यतेला औपचारिक स्वरुपात घोषित करणार आहे. मध्यपूर्वेत स्थायी शांततेच्या दिशेने फ्रान्सच्या प्रतिबद्धतेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. गाझामध्ये युद्ध थांबावे आणि नागरिकांचा जीव वाचावा हे सध्या सर्वात आवश्यक असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी या निर्णयाची कठोर निंदा केली. हा निर्णय दहशतवादाला इनाम देण्यासारखा आहे आणि तो गाझासारख्या आणखी एका इराणचे समर्थनप्राप्त प्रॉक्सीला जन्म देईल. अशास्थितीत पॅलेस्टिनी राष्ट्र इस्रायलसोबत शांततेसाठी नव्हे तर इस्रायलविरोधात वापरले जाईल असा दावा नेतान्याहू यांनी केला.
तर पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांना फ्रान्सकडून औपचारिक पत्र सोपविण्यात आले आहे. मॅक्रॉन यांच्या या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो, हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायदा आणि पॅलेस्टिनी जनतेच्या अधिकाराबद्दल फ्रान्सची प्रतिबद्धता दर्शविणारा असल्याचे पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष हुसैन अल-शीख यांनी म्हटले आहे.
140 हून अधिक देशांची मान्यता
पॅलेस्टाइनला अधिकृत मान्यता देणारा फ्रान्स हा सर्वात मोठा पाश्चिमात्य देश आहे. आतापर्यंत 140 हून अधिक देशांनी पॅलेस्टाइनला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. यात अनेक युरोपीय देशही सामील आहेत. पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची मागणी करत असून यात वेस्ट बँक, पूर्व जेरूसलेम आणि गाझापट्टीचे क्षेत्र सामील आहे.
ब्रिटन अन् जर्मनीसोबत बैठक
फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची ब्रिटन आणि जर्मनीच्या नेत्यांसोबत गाझामधील स्थिती, तेथील लोकांपर्यंत मदतसामग्री पोहोचविणे आणि युद्ध रोखण्याच्या मुद्द्यावर बैठक करणार आहेत. युरोपमधील सर्वात मोठी ज्यू आणि मुस्लीम लोकसंख्या फ्रान्समध्येच आहे. मध्यपूर्वेतील तणावाचा मोठा प्रभाव फ्रान्समध्येही दिसून येतो. फ्रान्स आणि सौदी अरेबिया पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रसंघात द्विराष्ट्र तोडग्यावर एका परिषदेचे आयोजन करणार असून यात अनेक देश सामील होतील.