फ्रान्सचा बांगलादेशला झटका
युनूस सोबत बैठकीस मॅक्रॉन यांचा नकार : दौरा करावा लागला रद्द
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना मोठा झटका दिला आहे. मॅक्रॉन यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करण्यास नकार दिला आहे. ही बैठक पुढील महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ महासागर संमेलनादरम्यान घेण्याचा बांगलादेश सरकारचा प्रयत्न होता. या संमेलनात सहभागी होण्यासाठी युनूस हे फ्रान्सच्या दौऱ्यावर येणार होते.
युनूस आणि मॅक्रॉन यांच्यात द्विपक्षीय बैठक व्हावी अशी विनंती बांगलादेश अंतरिम सरकारने केली होती, परंतु फ्रान्स सरकारने ही विनंती धुडकावून लावली आहे. फ्रान्स सरकारच्या या निर्णयामुळे युनूस यांच्या जागतिक स्तरावर स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नांना झटका बसला आहे.
मॅक्रॉन यांनी बैठकीस नकार दिल्याने युनूस यांचा फ्रान्स दौरा रद्द करण्यात आला आहे. संबंधित आंतरराष्ट्रीय संमेलन 9 जूनपासून फ्रान्सच्या नीस शहरात आयोजित होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष 8 जून रोजी संमेलनात सामील अतिथींसाठी रात्रीभोजनाचे आयोजन करणार आहेत. याकरता युनूस यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते.
फ्रान्सकडून संमेलनाचे निमंत्रण मिळाल्यावर मॅक्रॉन आणि युनूस यांच्यात द्विपक्षीय बैठक व्हावी म्हणून बांगलादेशने जोरदार प्रयत्न केले. संमेलनात सहभागी होणाऱ्या अनेक देशांनी यापूर्वीच द्विपक्षीय बैठकीची विनंती केली आहे, अशासिथतीत आणखी अन्य द्विपक्षीय बैठक होणे शक्य नसल्याचे फ्रान्स सरकारने बांगलादेशला कळविले आहे.
द्विपक्षीय बैठकांना नीस संमेलनासोबत जोडू इच्छित नाही. युनूस यांनी संमेलनात भाग घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे फ्रान्सने म्हटले आहे. युनूस हे स्वत:च्या सरकारसाठी समर्थन मिळविण्याकरता जागतिक नेत्यांच्या गाठीभेटीसाठी आतुर आहेत. अशास्थितीत मॅक्रॉन यांची भेट घेत जागतिक समुदायाला संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कुठल्याही संदेशासाठी द्विपक्षीय बैठक घेण्यास फ्रान्सने स्पष्ट नकार दिला. बांगलादेशने प्रथम फ्रान्सकडून नागरी विमाने खरेदी करण्यात रुची दाखविली होती, परंतु यात कुठलीच प्रगती झाली नाही.