फ्रान्सची बांगलादेवर मात
विश्वचषक कनिष्ठ हॉकी स्पर्धा : चिलीचा पहिला विजय
वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरू असलेल्या एफआयएच पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत मागील स्पर्धेत रौप्य मिळविलेल्या फ्रान्सने अपराजित घोडदौड कायम ठेवताना कडवा प्रतिकार करणाऱ्या बांगलादेशवर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळविला.
फ्रान्सने बलाढ्या कोरियाचा 11-1 तर ऑस्ट्रेलियाचा 8-3 असा याआधी पराभव केला असल्याने गट फ मध्ये ते 9 गुणांसह आघाडीवर आहेत. फ्रान्सने या सामन्यात शानदार प्रदर्शन केले असून सामन्याच्या बहुतेक भागात त्यांनीच नियंत्रण ठेवले होते. दुसऱ्याच मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली होती. पण बांगलादेशचा स्टार ड्रॅगफ्लिकर अमिरुल इस्लामने गोललाईनवर अप्रतिम बचाव करीत त्यांचा हा प्रयत्न फोल ठरविला. फ्रान्सने दबाव कायम ठेवत आणखी दोन शॉर्ट कॉर्नर्स मिळविले, त्यातील दुसऱ्याचे पेनल्टी स्ट्रोकमध्ये रुपांतर झाले. सातव्या मिनिटाला त्यावर टॉम गेलार्डने अचूक गोल नोंदवत फ्रान्सला आघाडीवर नेले.
दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या मिनिटाला बांगलादेशने पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण अमिरुलचा जोरदार फटका फ्रान्सचा गोलरक्षक अॅन्टोइन रॉबर्टने अचूक थोपविला. पण 28 व्या मिनिटाला बांगलादेशला बरोबरी साधण्यात यश आले. मोहम्मद अब्दुल्लाहने हा मैदानी गोल नोंदवला. मध्यंतरानंतर फ्रान्सने आपला खेळ उंचावला आणि दोन मैदानी गोल नोंदवत आघाडी 3-1 अशी वाढविली. गॅबिन लोराझुरी (32 वे मिनिट) व जेम्स लिदियार्द (38 वे मिनिट) यांनी हे गोल नोंदवले. या सामन्यात प्रकाशझोताची समस्या निर्माण झाल्याने तीन वेळा सामना थांबवावा लागला. बांगलादेशने अखेरपर्यंत झुंज देत बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांना दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले, त्यात दुसऱ्यावर अमिरुलने गोल नोंदवत फ्रान्सची आघाडी कमी केली. त्याचे आता स्पर्धेत 7 गोल झाले आहेत. मात्र फ्रान्सने एका गोलाची आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय साकार केला.
चिलीचा विजय
स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आलेल्या चिलीने गट ब मधील सामन्यात ओमानचा 2-0 असा पराभव केला. फेलिप डुइसबर्गने 10 व्या व टोमास ताबोर्गाने 47 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर चिलीचे गोल नोंदवले.