फ्रान्स पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-3 ने विजयी, पोर्तुगाल बाहेर
वृत्तसंस्था/ हॅम्बर्ग
पेनल्टी शूटआऊटमध्ये सतावणाऱ्या दुखण्यावर फ्रान्सने मात केली आहे. मात्र त्याचबरोबर त्यांनी क्रिस्तियानो रोनाल्डोची शेवटच्या युरोपियन चॅम्पियनशिपमधील वाटचाल देखील संपली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने पोर्तुगालचा 0-0 अशा बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये 5-3 असा पराभव केला. किलिअन एमबाप्पे आणि रोनाल्डो असा सॉकर सुपरस्टार्सचा हा संघर्षही होता.
पोर्तुगालचा बदली खेळाडू जुआंव फेलिक्सने शूटआऊटमध्ये एकमेव पेनल्टी चुकविताना चेंडू गोलखांब्यावर हाणला आणि थिओ हर्नांडेझने आपली कीक जाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात हाणून गोलात रुपांतर करताना दबावाचे कसलेही चिन्ह दाखवले नाही. फ्रान्स आता उपांत्य फेरीत स्पेनशी खेळेल,
या विजयामुळे एमबाप्पे आणि फ्रान्सला अलीकडे शूटआउट्समध्ये वाट्याला नामुष्की येण्याच्या समस्येचा शेवट झाला आहे. त्यांच्या शेवटच्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये म्हणजे 2021 च्या युरोमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत आणि 2022 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्यांना शूटआऊटमध्येच पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी एमबाप्पेने एकही पेनल्टी हाणली नाही.
नाकाला दुखापत झालेल्या एमबाप्पेला अतिरिक्त वेळेच्या मध्यांतराला बदलण्यात आले. मात्र पेनल्टीमध्ये त्याची गरज त्यांना भासली नाही. फ्रान्सच्या ओस्माने डेम्बेले, युसूफ फोफाना, ज्युल्स कौंडे आणि ब्रॅडली बारकोला या सर्वांनी गोल केले आणि शेवटी हर्नांडेझच्या गोलाने त्याची सांगता झाली.
रोनाल्डोच्या वाटचालीची समाप्ती
39 वर्षीय रोनाल्डोसाठी ही विक्रमी सहावी आणि शेवटची युरोपियन चॅम्पियनशिप होती त्याने शूटआउटमध्ये पोर्तुगालचा पहिला पेनल्टी गोल केला आणि नंतर तो अनुभवी सहकारी पेपेचे सांत्वन करताना दिसला. रोनाल्डोच्या युरोमधील 20 वर्षांच्या कारकिर्दीत 2016 मधील विजेतेपदाचा समावेश आहे. त्यावेळी पोर्तुगालने फ्रान्सला अंतिम फेरीत पराभूत केले होते. पाच वेळा वर्षाचा जागतिक खेळाडू ठरलेला रोनाल्डो 2026 च्या विश्वचषकापर्यंत त्याच्या देशासाठी खेळत राहणार का हे आता पाहावे लागेल. तो तेव्हा 41 वर्षांचा असेल.