फॉक्सकॉन स्थापणार भागीदारीत चीपनिर्मितीचा मोठा कारखाना
एनव्हिडीयासोबत केली भागीदारी : चीप निर्मिती क्षेत्रात घेणार भरारी
नवी दिल्ली :
चीप उत्पादनासाठी फॉक्सकॉन सर्वात मोठा निर्मिती कारखाना भारतात सुरू करणार आहे. एनव्हिडीया यांच्यासोबत भागीदारीच्या माध्यमातून फॉक्सकॉन चीप निर्मितीचे कार्य मोठ्या प्रमाणात भारतात हाती घेणार असल्याची माहिती मिळते आहे.
मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी
अॅपल कंपनीच्या आयफोनची जोडणी फॉक्सकॉन ही कंपनी आपल्या भारतातल्या कारखान्यात करत आली आहे. ही जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती कंपनी आहे. कंपनी अलीकडच्या काळात कृत्रिम बुद्धिमता अर्थात आर्टिफिशीयल इंर्टलिजन्स याचा आधार घेत निर्मिती क्षमतेला आवश्यक ते बळ देत आहे. याचा उपयोग कंपनीला निर्मिती वाढीसोबत इतर सर्व घटकांकरीता होतो आहे.
ठिकाण निश्चित नाही
मोठ्या चीप कारखान्याची उभारणी करण्यात येणार असली तरी अद्याप कारखाना कोठे उभारावा याबाबत निश्चित झालेले नाही, असे समजते. वर म्हटल्याप्रमाणे भागीदारीअंतर्गत आगामी काळात फॉक्सकॉन कंपनी एनव्हिडीया यांच्यासोबत जीबी 200 चीपचे उत्पादन हाती घेणार आहे. हा सर्वात मोठा चीप निर्मितीचा कारखाना असेल, असेही कंपनीने म्हटले आहे. परंतु सदरचा नवा कारखाना भारतात कोठे स्थापन केला जाणार आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही.