चौथी ‘टी-20’ लढत आज
भारतीय गोलंदाजांपुढे कामगिरी सुधारण्याचे आव्हान
वृत्तसंस्था/ रायपूर
भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी ‘टी20’ लढत आज शुक्रवारी येथे होणार असून सध्या ज्याची कसोटी लागलेली आहे तो भारताचा युवा गोलंदाजी विभाग ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीचा फायदा घेण्याचा आणि आपली शेवटच्या षटकांतील कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या सामन्यात 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरीत्या केला आणि त्यांना शेवटच्या दोन षटकात 40 पेक्षा जास्त धावा काढण्यापासून रोखण्यात भारतीय गोलंदाजी अपयशी ठरली. त्यामुळे भारतीय गोलंदाजीच्या दुसऱ्या फळीचे चांगले चित्र उभे राहिलेले नाही.
प्रसिद्ध कृष्णाने मागील सामन्यात चार षटकांत 68 धावा दिल्या. त्यात 21 धावा अंतिम षटकात काढल्या गेल्या. त्यामुळे भारतीय संघात किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे. दीपक चहर परतलेला असून नवीन चेंडू स्विंग करण्याच्या क्षमतेचा विचार करून त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. शेवटच्या षटकांत प्रभावी गोलंदाजी करणारा मुकेश कुमारही एका सामन्याच्या विश्रांतीनंतर परतलेला आहे. प्रसिद्ध आणि आवेश खान या दोघांच्याही गोलंदाजीत विविधता आणि नाविन्य दिसलेले नाही. दोघेही ताशी 130 हून जास्त किंवा 140 च्या आसपास वेगाने गोलंदाजी करत असले, तरी त्यांना योग्य टप्पा राखता आलेला नाही. तसेच भारतीय खेळपट्ट्यांच्या स्वरुपांनी त्यांची धार आणखी कमी केली आहे.
फलंदाजीत श्रेयस अय्यरचे पुनरागमन म्हणजे तिलक वर्माला संघाबाहेर बसविले जाऊ शकते. कारण यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फिनिशर रिंकू सिंग यांची निवड पक्की आहे. गुवाहाटी येथे शेवटच्या चेंडूवर विजय मिळविलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान पाच सामन्यांच्या मालिकेत एकहाती जिवंत ठेवणारा मॅक्सवेल तसेच स्टीव्ह स्मिथ आणि अॅडम झॅम्पासारख्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा उठविण्याकडे भारताचा कल राहील. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने मॅक्सवेलसह अनेक अव्वल खेळाडूंना ‘टी20’ विश्वचषकापूर्वी त्यांच्यावरील भार आणि तंदुरुस्ती लक्षात घेऊन मालिकेच्या मध्यास विश्रांती दिलेली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या फळीचा भारतीय संघ मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीतून सावरत आहे आणि येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर तो फलंदाजीसाठी येणार नाही हे जाणून भारतीय गोलंदाजांना निश्चितच दिलासा मिळालेला असेल. त्याऐवजी त्यांना कदाचित टीम डेव्हिड, जोश फिलिप आणि बिग हिटर बेन मॅकडरमॉटसारख्या खेळाडूंचा सामना करावा लागेल. मात्र मॅक्सवेलचा सामना करण्यापेक्षा ते निश्चितच चांगले आहे.
भारताच्या गोलंदाजांना तरीही विश्वचषक स्पर्धेतील भारताविऊद्धच्या अंतिम सामन्यात शानदार शतकी खेळी केलेला ट्रेव्हिस हेड आणि चालू मालिकेत संघाचे नेतृत्व करत असलेला अनुभवी मॅथ्यू वेड यांचा सामना करावा लागेल. गुवाहाटीप्रमाणेच या भागातही डिसेंबरमध्ये संध्याकाळी दव पडतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार नि:संशयपणे दुसऱ्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. मुख्य खेळाडू परतल्याने त्यांची जागा घेणारे खेळाडू ऑस्ट्रेलियन संघात सामील झाले आहेत आणि ते आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असतील.
युवा यशस्वी जैस्वाल, इशान किशन, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि गरज पडेल तेव्हा मदतीस आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या जोरावर भारताने फलंदाजी चांगली केलेली आहे. हे खेळाडू आपला फॉर्म राखतील अशी अपेक्षा आहे. त्यातही ऋतुराज गायकवाडचा आत्मविश्वास भरपूर उंचावलेला असेल. कारण त्याने मागील सामन्यात 57 चेंडूंत 123 धावा काढल्या. जेसन बेहरेनडॉर्फ, केन रिचर्डसन आणि तन्वीर संघा यासारख्या गोलंदाजांना पुन्हा एकदा परीक्षा कठीण जाऊ शकते. आतापर्यंत सहा डावांत पाच वेळा 200 हून अधिक धावसंख्या नोंदली गेली असून ही मालिका प्रतिकूल परिस्थितीमुळे गोलंदाजांसाठी दु:स्वप्नावत ठरली आहे.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, दीपक चहर.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, टीम डेव्हिड, बेन ड्वारशुइस, नॅथन एलिस, ख्रिस ग्रीन, एरॉन हार्डी, ट्रेव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.
थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18, कलर सिनेप्लेक्स