चौदा जुळे, एक तिळे !
-आता यात आश्चर्य ते काय ? प्रत्येक वर्षी प्रत्येक माध्यमिक शाळेतून दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अनेक विद्यार्थी बाहेर पडत असतात. त्यांच्यापैकी जर कोणाला गुणवत्ता सूचीत स्थान मिळाले असेल तर त्याचे नाव आणि छायाचित्र वृत्तपत्रातून प्रसिद्धही होते. ही प्रत्येक गावातील दरवर्षीचीच प्रथा आहे. तथापि, या कूपर सिटी शाळेतून 10 वी होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची काही वैशिष्ट्यो आहेत. या वैशिष्ट्यांमुळे यावर्षी ही शाळा अमेरिकेच्याच नव्हे. तर जगाच्या चर्चेचा विषय झाली आहे.
या 543 विद्यार्थ्यांमध्ये 14 जुळे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहेत. तसेच एका तिळ्याचाही समावेश आहे. जुळे आणि तिळे मिळून या विद्यार्थ्यांची संख्या 31 इतकी आहे. जुळ्यांपैकी दोन जुळे विद्यार्थी अगदी एकमेकांसारखे दिसणारे आहेत. त्यांना ‘समान जुळी’ किंवा आयडेंटिकल ट्विन्स म्हणतात. इतर जुळे विद्यार्थी एकमेकांसारखे न दिसणारे प्रेटर्नल ट्विन्स आहेत. एकाच वर्षी एका शाळेत दहावीच्या वर्गात इतक्या मोठ्या संख्येने जुळे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि एक तिळे असणे ही घटना असामान्य आहे. अशी घटना जगात आजवर कोणत्याही शाळेत घडली नसावी, असे अनेकांचे मत आहे. या शाळेचे प्रमुख तसेच इतर शिक्षकही या अद्भूत आणि जगावेगळ्या घटनेने आश्चर्यचकित झालेले आहेत.