For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस

06:58 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिन्नास्वामीवर चौकार षटकारांचा पाऊस
Advertisement

हैदराबादचा आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम : रोमांचक सामन्यात आरसीबी 25 धावांनी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या हायस्कोरिंग सामन्यात हैदराबादने  आरसीबीचा 25 धावांनी पराभव केला. हैदराबादनं दिलेल्या 288 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीनं 262 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून दिनेश कार्तिक आणि फाफ डु प्लेसिस यांनी लढा दिला, पण विजय मिळून देऊ शकले नाहीत. ट्रेव्हिस हेडचे व क्लासेन यांच्या वादळी खेळीच्या साक्षीने हैदराबादने यजमान आरसीबीविरुद्ध आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च विक्रमी धावसंख्या (287) नोंदवली. 39 चेंडूत 9 चौकार व 8 षटकारांसह 102 धावांची तुफानी खेळी साकारणाऱ्या ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, आरसीबीला सात सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादनं चौथ्या विजयाची नोंद केली. हैदराबादचा संघ आठ गुणांसह चौथ्या स्थानावर विराजमान आहे.

Advertisement

कार्तिकच्या अफलातून खेळीनंतरही आरसीबी पराभूत

288 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेलिस यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पॉवरप्लेमध्ये 79 धावा वसूल केल्या. मयांक मार्कंडेने विराट कोहलीला बाद करत आरसीबीला पहिला धक्का दिला. विराट कोहलीने 20 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. विल जॅक्स 7, रजत पाटीदार 9, सौरव चौहान 0 यांना मोठी खेळी करता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला डु प्लेसिसने मात्र 28 चेंडूमध्ये 4 षटकार व 7 चौकारासह 62 धावांची खेळी केली. दहाव्या षटकात डु प्लेसिसला कमिन्सने बाद केले. अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना दिनेश कार्तिकने शानदार फलंदाजी केली. कार्तिकने 35 चेंडूमध्ये 83 धावांची झंझावाती खेळी केली. यामध्ये सात षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. कार्तिकने अखेरच्या क्षणापर्यंत आरसीबीसाठी झुंज दिली. पण हैदाराबादने सामन्यात बाजी मारली. आरसीबीला 7 बाद 262 धावापर्यंत मजल मारता आली. अनुज रावत 25 तर महिपाल लोमोररने 19 धावांची खेळी केली.

ट्रेव्हिस हेडचे वादळी शतक, क्लासेनचीही फटकेबाजी

प्रारंभी, यजमान आरसीबीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि हेड या सलामीच्या जोडीने प्रारंभापासूनच आक्रमक हल्ला करीत पॉवरप्लेच्या 6 षटकात 76 धावा झोडपल्या. डावातील 9 व्या षटकात बेंगळूरला ही जोडी फोडण्यात यश मिळाले. टॉप्लेने शर्माला फर्ग्युसनकरवी झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 34 धावा जमविताना हेडसमवेत 49 चेंडूत 108 धावांची भागीदारी केली. शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हेन्रिच क्लासेनने हेडला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 26 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. हेड आणि क्लासेन यांनी 23 चेंडूत अर्धशतकी भागीदारी नोंदविली. क्लासेनने 23 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात हेड डु प्लेसीकरवी झेलबाद झाला. त्याने 41 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांसह 102 धावा झोडपल्या. हेडने आपले शतक 39 चेंडूत 8 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने  पूर्ण केले. 17 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फर्ग्युसनने क्लासेनला झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 7 षटकार आणि 2 चौकारांसह 67 धावा जमविताना मार्करमसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 66 धावांची भागीदारी केली.

दरम्यान हैदराबाद संघाच्या डावातील 18 वे षटक संपल्यानंतर आरसीबीने अनुज रावतला यश दयालच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले. हैदराबाद संघाच्या 250 धावा 112 चेंडूत फलकावर लागल्या. त्यांनी शेवटच्या 3 षटकामध्ये 56 धावा झोडपल्या. मार्करम आणि समद यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 56 धावांची भागीदारी 18 चेंडूत नोंदविली. मार्करमने 17 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 32 तर अब्दुल समदने 10 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 37 धावा झोडपल्या.

संक्षिप्त धावफलक : सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 3 बाद 278 (अभिषेक शर्मा 34, हेड 102, क्लासेन 67, मार्करम नाबाद 32, अब्दुल समद नाबाद 37, अवांतर 15, फर्ग्युसन 2-52, टॉप्ले 1-68).

आरसीबी 20 षटकांत 7 बाद 262 (विराट कोहली 42, डु प्लेसिस 62, दिनेश कार्तिक 35 चेंडूत 83, रावत नाबाद 25, पॅट कमिन्स 3 बळी, मार्कंडेय 2 तर नटराजन 1 बळी).

हैदराबादने मोडला स्वत:चा विक्रम

आयपीएलमध्ये 27 मार्च रोजी हैदराबाद येथे झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात सनरायजर्स हैदराबादने 3 बाद 277 धावांचा विक्रम केला होता. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोर होता. आता आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्यांनी स्वत: चाच विक्रम मोडीत काढत 287 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस

बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी अक्षरश : चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. हैदराबाद संघाकडून 22 षटकार लगावण्यात आले तर आरसीबीकडून 16 षटकार ठोकण्यात आले. हैदराबादच्या फलंदाजांनी 19 चौकार ठोकले तर आरसीबीकडून 24 चौकारांचा पाऊस पाडण्यात आला. 40 षटकांमध्ये हैदराबाद आणि आरसीबी संघानं 547 धावांचा पाऊस पाडला.

हेडचे आयपीएलमधील चौथे वेगवान शतक

ट्रेविस हेडने आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. बंगळुरुच्या मैदानावर हेडने 39 चेंडूत शतक साजरे केले. हेडचे हे आयपीएलमधील चौथे सर्वात वेगवान शतक आहे. आता तो कोहली, बटलर आणि रोहितनंतर यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज

  1. 30 चेंडू - ख्रिस गेल
  2. 37 चेंडू - युसूफ पठाण
  3. 38 चेंडू - डेव्हिड मिलर
  4. 39 चेंडू - ट्रॅव्हिस हेड
  5. 42 चेंडू - अॅडम गिलख्रिस्ट
Advertisement
Tags :

.