चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार महिला पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढते आहे. गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चार महिलांना पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सोमवारी दुपारी गणपत गल्ली परिसरात ही घटना घडली आहे. पांगुळ गल्ली येथून चार महिला धावत येत होत्या. त्यांच्यामागे काही जण ‘चोर, चोर’ असे ओरडत पाठलाग करीत होते. या महिला चोरी करून पळून जात असतील या संशयाने गणपत गल्ली येथे त्यांना अडविण्यात आले. त्यांना जाब विचारण्यात आला. मात्र, त्यांना अडवणाऱ्या तरुणावरच या महिलांनी उलटे आरोप करण्यास सुरू केली. तोपर्यंत पांगुळ गल्लीपासून त्यांचा पाठलाग करणारेही गणपत गल्ली परिसरात पोहोचले. महिला व नागरिक यांच्यात वादावादी झाली. खडेबाजार पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्या चारही महिलांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले. सायंकाळपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.
महिला गँगवाडी परिसरातील
या महिला गँगवाडी परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. कोणत्याही सण, उत्सवाच्यावेळी बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत पाकीटमारी, मोबाईल चोरीचे प्रकार केले जातात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस खरेदीसाठी गर्दी वाढते आहे. पाकीटमारी, मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.