ओम बीचवर समुद्रात बुडणाऱ्या चार पर्यटकांना वाचविण्यात यश
कारवार : सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र गोकर्ण परिसरातील कुडले आणि ओम बीचवर समुद्रात बुडणाऱ्या चार पर्यटकांना वाचविण्यात जीवक्षक आणि प्रवासी मित्रांना वाचविण्यात यश आले आहे. यामध्ये दोन रशियन पर्यटकांचा समावेश आहे. गोकर्ण परिसरातील कुडले बीचवर पर्यटनासाठी दाखल झालेल्या रशियामधील तिघी मैत्रिणी पोहण्यासाठी अरबी समुद्रात उतरल्या होत्या. यापैकी इरिना (वय 37) आणि अन्य एक (वय 27) या दोन पर्यटक महिला लाटेच्या तडाख्यात सापडून जीव वाचविण्यासाठी धडपड करू लागल्या. पर्यटक महिला अडचणीत आल्याचे येताच कुडले बीचवर सेवा बचावत असलेल्या नागेंद्र एस., कुडले, मंजुनाथ हरिकंत्र या जीवरक्षकांनी आणि प्रवासी मित्र शेखर हरिकंत्र यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी लाटांचा जोर अधिक होता. त्यामुळे जीवरक्षक व प्रवासी मित्राने पॅरा सेलिंग होडीचा वापर करून बुडणाऱ्या विदेशी पर्यटक महिलांना वाचविले. दरम्यान, अन्य एका घटनेत विदेशी मित्रांसह गोव्यातील तिघे पर्यटक गोकर्ण जवळच्या सुप्रसिद्ध ओम बीचवर पर्यटनासाठी आले होते. तिघेही पोहोण्यासाठी समुद्रात उतरले होते. त्यावेळी सारंग (वय 23), आदित्य बुद्धीकर (वय 24, रा. दोघेही गोवा) लाटांच्या विळख्यात सापडून गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब लक्षात येताच जीवरक्षक शुक्रू गौडा, वेंकटरामन गौडा आणि राजू गोवेकर यांनी आपला जीव धोक्यात घालून बुडणाऱ्यांना सुखरुप पाण्याबाहेर काढले.