माथेफिरूच्या शोधासाठी चार पथके
संशयित आरोपीचे रेखाचित्र जाहीर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बेळगावला भेट
बेळगाव : पुद्दुच्चेरी-मुंबई चालुक्य एक्स्प्रेसमध्ये चाकूहल्ला करून एका कर्मचाऱ्याचा बळी घेणाऱ्या व टीसीसह अन्य चौघा जणांवर हल्ला करणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्यासाठी चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी संशयिताचे रेखाचित्र प्रसिद्ध केले असून रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जखमींची भेट घेऊन माहिती घेतली आहे. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी चालुक्य एक्स्प्रेसमधील एस-8 बोगीत थरार घडला होता. टीसीने तिकीट विचारले म्हणून धावत्या रेल्वेत एका पाठोपाठ एक चौघा जणांवर चाकूहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात देवर्षी वर्मा (वय 25, रा. उत्तरप्रदेश) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. टीसी अश्रफ अली कित्तूर (वय 27) यांच्यासह अन्य जखमी झाले आहेत. शुक्रवार दि. 17 मे रोजी सकाळी रेल्वे विभागाचे डीआयजी एस. डी. शरणप्पा व पोलीसप्रमुख डॉ. सौम्यलता एस. के. यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून एकंदर घटनेची माहिती घेतली. दरम्यान हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या देवर्षीचा भाऊ कल्याणहून शुक्रवारी बेळगावात दाखल झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.