खानापूर तालुक्यात 24 तासांत चार आत्महत्या
तालुक्यात एकच खळबळ : आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन-जनजागृतीची गरज
खानापूर /प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी 24 तासात एकूण चार आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. तालुक्यातील प्रभूनगर, बेकवाड, गंगवाळी, आणि नंदगड येथील रहिवाश्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एका तऊण मुलीचाही समावेश आहे. त्यामुळे खानापूर पोलीस ही चक्राहून गेले आहेत. खानापूर आणि नंदगड पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील गंगवाळी येथील रमेश दत्तू निलजकर (वय 36) याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र घरच्या लोकांनी त्याला वाचवले होते. त्याला उपचारासाठी बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. प्रभूनगर येथील सत्याप्पा माऊती भंगी (वय 42) याने राहत्या घरी शुक्रवारी रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
शिक्षकाची आत्महत्या
नंदगड येथील कन्या विद्यालयातील शिक्षक संदीप प्रभाकर शिंदे (वय 44) रा. नंदगड यांनी शनिवारी सकाळी खानापूर येथील बेळगाव-पणजी महामार्गालगत असलेल्या एका शेतातील आंब्याच्या झाडाला प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दुपारी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ही घटना दृष्टीस पडली. याबाबतची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली असता खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संदीप शिंदे हे सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर ते शाळेत गेले नाहीत आणि कोणाचाही फोन उचलत नसल्याने शिंदे यांच्या घरच्यांनी नंदगड पोलिसांशी संपर्क साधून मोबाईल ट्रेकिंग करण्यास सांगितले होते घरचे लोक आणि नंदगड पोलीस मोबाईलच्या लोकेशनवर पोहोचेपर्यंत संदीप यांनी आत्महत्या केली होती. घटनेचा पंचनामा करून मृतदेह इस्पितळात हलवण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंदगड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे. नंदगड येथील लक्ष्मी यात्रेनिमित्त वार गोंधळ सुरू असल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गाव गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. संदीप शिंदे यांनी सकाळीच घरातून बाहेर पडून खानापूर येथे येऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
मोबाईलचा वापर कमी कर म्हटल्याने तरुणीची आत्महत्या
बेकवाड येथील बारावीत शिकणारी नकुशा माऊती तळवार (वय 19) या मुलीने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई-वडिलांनी मोबाईल जास्त बघू नको, अभ्यास कर म्हणून समजावल्याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले सदर घटनेची नोंद नंदगड पोलिसांत झाली आहे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्यावर बेकवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या 24 तासांत झालेल्या चार आत्महत्यांच्या घटनेमुळे खानापूर येथील सरकारी दवाखान्याच्या आवारात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. आत्महत्यांच्या घटनांमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली असून गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात आत्महत्याचे सत्र सुरू आहे. होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी समुपदेशनाची आणि जनजागृतीची गरज असल्याचे मत काही समाजसेवक आणि जेष्ठ नागरिकांना व्यक्त केले आहे.