For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

10:52 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
चार विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
Advertisement

दोघे गंभीर, अनेक विद्यार्थी जखमी : जमखंडी तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली-स्कूल बसचा भीषण अपघात

Advertisement

वार्ताहर /जमखंडी

स्कूल बस व उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भीषण अपघात होऊन चार विद्यार्थी ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची दुर्घटना जमखंडी तालुक्यातील अलगूरनजीक रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. गोविंद सदाशिव जंबगी (वय 13), श्वेता शिवनगौड पाटील (वय 12), बसवराज कोट्टगी (वय 17), सागर गुरुलिंग कडकोळ (वय 16 रा. कवटगी) हे जागीच ठार झाले आहेत, तर दोघा गंभीर जखमींवर विजापूर येथे उपचार सुरू आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, अलगूर येथील वर्धमान न्यामगौड या खासगी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडल्यानंतर आपापल्या घराकडे विद्यार्थी शाळेच्या स्कूल बसमधून (केए 48 7254) निघाले होते. जमखंडी-विजापूर या राज्य मार्गावर बसची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात चार विद्यार्थी ठार झाले. तसेच दोन विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना अधिक उपचारासाठी विजापूर येथे दाखल करण्यात आले. तर काही जखमी विद्यार्थ्यांवर जमखंडीतील सरकारी व खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Advertisement

हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर ट्रॉली उलटली असून स्कूल बसचा एका बाजूचा चुराडा झाला आहे. अपघाताची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच बागलकोट जिल्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी अमरनाथ रे•ाr यांनी येथील सरकारी दवाखान्याला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जमखंडीचे डीवायएसपी शांतवीर ई, सीपीआय मल्लाप्पा मद्दी यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिली. जिल्हाधिकारी एस जानकी, जमखंडी उपविभाग अधिकारी संतोष कामगोंड, तहसीलदार सदाशिव मक्कोजी, क्षेत्र शिक्षण अधिकारी अशोक बसनवर, नगरपालिका आयुक्त् लक्ष्मी अष्टगी आदींनी भेट दिली. आमदार जगदीश गुडगुंटी, माजी आमदार आनंद न्यामगौड यांनी जखमींची व मयत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले व सरकारकडून आर्थिक मदत देऊ करण्याचे आश्वासन दिले. आमदार जगदीश गुडगुंटी यांनी मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला वैयक्तिक 25 हजार रुपये देण्याचे जाहीर केले. खासगी रुग्णालयातही उपचार मोफत करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे कळते. स्नेहसंमेलन संपवून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखाची मदत

बेंगळूर : जमखंडीजवळ अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर गंभीर जखमी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 50 हजार रु. मदत देण्याची घोषणा ट्विटरवर केली आहे. जमखंडी तालुक्यातील आलगूर येथील अपघातात चार शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच दु:ख झाले. कोवळ्या वयातील मुलांचा मृत्यू हा नियतीने केलेला घोर अन्याय आहे. मृत विद्यार्थ्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.