For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासगी सावकार खूनप्रकरणी चौघा जणांना पोलीस कोठडी

11:30 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासगी सावकार खूनप्रकरणी चौघा जणांना पोलीस कोठडी
Advertisement

बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक संतोष पद्मण्णवर खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पत्नीसह चौघा जणांना चौकशीसाठी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. मंगळवारी न्यायालयाची परवानगी घेऊन माळमारुती पोलिसांनी त्यांना कोठडीत घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. संतोषची पत्नी उमा पद्मण्णवर (वय 41), शोभित गौडा (वय 27), पवन रामनकट्टी (वय 27), मंजुनाथ जोरकल (वय 31) या चौघा जणांना पोलिसांनी अटक केली होती. खून प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने चार दिवसांची कोठडी दिली आहे. दि. 9 ऑक्टोबर रोजी रिअल इस्टेट व्यावसायिक व खासगी सावकारी करणाऱ्या संतोष पद्मण्णवर याचा खून करण्यात आला होता. हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. संतोषची मुलगी संजना हिने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

15 ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमीत पुरलेला मृतदेह उकरून काढून शवचिकित्सा करण्यात आली. झोपेच्या गोळ्या देऊन झोप लागल्यानंतर उशीने तोंड दाबून त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील चौकशीसाठी चौघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहातून त्या चौघा जणांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. संतोषला संपविण्यासाठी झोपच्या गोळ्या कोठून आणल्या याचा शोध घेण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.