For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यातील रहिवाशाला 30 लाखांचा गंडा

11:15 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्यातील रहिवाशाला 30 लाखांचा गंडा
Advertisement

व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक, टिळकवाडी पोलिसात एफआयआर

Advertisement

बेळगाव : हेल्थ केअर कंपनीत गुंतवणूक करा, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, असा सल्ला देत बेळगाव येथील एका युवकाने गोव्याच्या रहिवाशाला सुमारे 30 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. पेडे-करासवाड, ता. बार्देश येथील चार्ल्स बेसिल पिन्हो (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांगली गल्ली येथील अनिरुद्ध अनंत दळवी याच्याविरुद्ध भादंवि 406, 420 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांचे सहकारी याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी चार्ल्स यांनी फिर्याद दिली आहे. म्हापसा-गोवा येथे चार्ल्स चिराग डेकोर नामक व्यवसाय चालवतात. बेळगाव येथील अनिरुद्ध अनंत दळवी हा चार्ल्स यांच्या घरी गेला होता. हेल्थ केअर कंपनीची फ्रँचाईजी सुरू करा, तुमचा व्यवसाय चांगला चालेल, असा सल्ला त्याने दिला. अनिरुद्धच्या सांगण्यावर विश्वास ठेवून चार्ल्स यांनी 1 जुलै 2021 व 7 ऑक्टोबर 2021 रोजी दोन टप्प्यात अनिरुद्धच्या खात्यावर 30 लाख रुपये जमा केले. रक्कम जमा केली त्यावेळी चार्ल्स नोकरीनिमित्त कुवेतला होते. टिळकवाडी येथील अनिरुद्धच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. हेल्थ केअर कंपनी आगरकर रोड, टिळकवाडी येथे असल्याचे चार्ल्स यांना सांगण्यात आले होते.

Advertisement

कुवेतहून परतल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला अनिरुद्धने दिला होता. 1 जानेवारी 2022 रोजी चार्ल्स कुवेतहून गोव्यात आले. अनिरुद्धशी संपर्क साधून त्यांनी ठरल्याप्रमाणे व्यवसाय सुरू करण्याचे सांगितले. 1 एप्रिल 2022 रोजी तुमचा व्यवसाय सुरू झाला आहे. बाजारपेठेत उत्पादनांची विक्रीही सुरू झाली आहे. त्याचा नफा म्हणून 6 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश अनिरुद्धने दिला. अनिरुद्धने दिलेला धनादेश वटला नाही. त्यामुळे ही कंपनीच बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपण गुंतवलेले पैसे परत कर, असे सांगत चार्ल्स यांनी तगादा लावला. त्यावेळी तुम्ही दिलेले पैसे आपण क्रिप्टो करन्सी, फॉरेक्स, ऑईल, सोने व जमिनीत गुंतवणूक केल्याचे अनिरुद्धने त्यांना सांगितले.  12 सप्टेंबर 2024 रोजी अनिरुद्धने त्यांना 45 हजार रुपये परत केले. व्यवसाय तर दूरच उर्वरित रक्कमही परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची तक्रार चार्ल्स यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केली आहे.

Advertisement
Tags :

.