एकाच कुटुंबातील चौघा जणांना तरुणाच्या खूनप्रकरणी अटक
तोरणगट्टी येथे घडली होती घटना : फोन कॉलमुळे दोन कुटुंबात वादंग
बेळगाव : तोरणगट्टी (ता. रामदुर्ग) येथील एका तरुणाच्या खूनप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी तोरणगट्टी येथील गोपाल काशप्पा शिवापूर उर्फ सोप्पडल (वय 26) या तरुणावर हल्ला करण्यात आला होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कटकोळ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित्रा मल्लिकार्जुन संगोळ्ळी (वय 27), तिचे वडील मल्लिकार्जुन इराप्पा कट्टी (वय 60), भाऊ शंकर मल्लिकार्जुन कट्टी (वय 29 सर्व रा. तोरणगट्टी) व सुमित्राचा मामा पत्र्याप्पा चण्णाप्पा चिकुंबी (वय 35 रा. बशीडोणी, ता. सौंदत्ती) अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक आय. आर. पट्टणशेट्टी, उपनिरीक्षक बसवराज कोन्नुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दहा दिवसांपूर्वी सुमित्रा माहेरी आली होती. गोपालने तिला फोन केला होता. या फोन कॉलमुळे दोन कुटुंबात वादंग निर्माण झाले होते. सोमवारी एकाच कुटुंबातील चौघा जणांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने व तीक्ष्ण हत्याराने गोपालवर हल्ला करून त्याचा खून केला होता. खुनानंतर केवळ 24 तासांत एकाच कुटुंबातील चौघा जणांना अटक केल्याचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले.