विजापूर चकमकीत चार नक्षलवादी ठार
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील विजापूरमध्ये शनिवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या संघर्षात चार नक्षलवादी ठार झाल्याचे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. ही चकमक जिह्याच्या नैर्त्रुत्य वनक्षेत्रात झाली. गोपनीय सूत्रांकडून नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू करत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. चकमकीच्या ठिकाणाहून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. याशिवाय, घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात इन्सास आणि एसएलआर सारख्या अत्याधुनिक रायफल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत परिसरात शोधमोहीम सुरूच होती. अधूनमधून गोळीबार सुरू होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून छत्तीसगडमध्ये एकूण 225 नक्षलवादी मारले गेले असून त्यापैकी 208 बस्तर विभागातील विजापूर, बस्तर, कांकेर, कोंडागाव, नारायणपूर, सुकमा आणि दंतेवाडा या सात जिह्यांमधील आहेत. ही आकडेवारी सुरक्षा दलांच्या कारवाईचे मोठे यश मानले जात आहे.