ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांचे निधन
वयाच्या 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास : विविध नेत्यांकडून श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेंगळूर
दावणगेरे दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार, माजीमंत्री आणि अखिल भारत वीरशैव महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा यांचे रविवारी निधन झाले. वृद्धापकाळाच्या आजाराने ग्रस्त असलेले शामनूर शिवशंकरप्पा 94 वर्षांचे होते. त्यांना बेंगळूरमधील एका खासगी ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचाराचा उपयोग न झाल्याने रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शामनूर शिवशंकरप्पा भारतातील सर्वात वयस्कर आमदार होते. तथापि, वृद्धापकाळाच्या आजारांमुळे त्यांना अनेक दिवसांपासून बेंगळूरमधील स्पर्श ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी पसरत असल्याने, त्यांचे पुत्र मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांनी यावर प्रतिक्रिया देत आपले वडील बरे आहेत. गुऊच्या आशीर्वादाने त्यांना पुढील आठवड्यात ऊग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे सांगितले होते. तथापि, दुर्दैवाने उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांचे निधन झाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ऊग्णालयाला भेट देऊन शिवशंकरप्पा यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून माहिती घेतली होती. त्याचवेळी ऊग्णालयात असलेल्या दावणगेरेच्या खासदार डॉ. प्रभा मल्लिकार्जुन यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सासऱ्यांच्या प्रकृतीची आणि उपचारांची माहिती दिली होती. अशाप्रकारे, मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी ऊग्णालयात भेट देऊन शामनूर शिवशंकरप्पा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शामनूर शिवशंकरप्पा यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी दावणगेरे येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना आणि पूजा केली होती.
भारतातील सर्वात वयस्कर आमदार मानले जाणारे शामनूर शिवशंकरप्पा यांचा जन्म 16 जून 1931 रोजी दावणगेरे येथे झाला. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवशंकरप्पा यांनी राजकारण, शिक्षण, व्यवसाय आणि समाजसेवेत स्वत:चा ठसा उमटवला. दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले शिवशंकरप्पा सहावेळा आमदार, एकदा खासदार आणि मंत्रीही होते. ते दावणगेरे आशाकिरण ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड, दावणगेरे क्रिकेट क्लब आणि दावणगेरे स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष, बापूजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि अनेक व्यावसायिक शैक्षणिक संस्था आणि बापूजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते.
शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, शोभा करंदलाजे, व्ही. सोमण्णा, मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मंत्री एम. बी. पाटील, मंत्री डॉ. जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, खासदार जगदीश शेट्टर, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह विविध नेते, स्वामीजींनी शोक व्यक्त केला आहे.