Satara News : चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री तरीही खड्ड्यांत महाबळेश्वर -पाचगणीचा रस्ता !
खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटकांना त्रास ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
सातारा : सातारा जिल्ह्यात चार-चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री तरीही महाबळेश्वर- पाचगणीचा रस्ता खड्डेमय अवस्थेतचआहे. हा नेमका विकास आहे की ढिसाळ कारभार, असा प्रश्न वाहनचालक व पर्यटक विचारत आहेत. या मार्गाची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
खड्ड्यांचं साम्राज्य; प्रवास म्हणजे थोकामहाबळेश्वर बांधकाम विभाग कार्यालयापासून वेण्णा लेकमार्ग पसरणी घाट, पाचगणी रोडवर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य पसरले आहे. या मार्गावर प्रवास करताना रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, हेच ओळखता येत नाही. जिथे डांबर टाकलं, ते पावसाळ्यात वाहून गेलं आणि पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे मलमपट्टी करून वेळ मारून नेण्याचा सरकारी डाव आता प्रवाशांच्या अंगाशी येत आहे. या मार्गावर जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत. असल्याचे स्थानिक सांगत आहेत.
दिवाळीला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्टीत महाबळेश्वर-पाचगणीत पर्यटकांची मोठी गर्दी उसळणार आहे. पण पर्यटन हंगामातच ररता खड्डेमय आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर-वाई-पाचगणी हा वर्दळ असणारा मार्ग असूनही त्याची स्थिती वाईट आहे. उलट मेढा, पोलादपूर, तापोळा या मार्गावर नव्याने डांबरीकरण झालं आहे. मग महाबळेश्वर-पाचगणी मार्ग का दुर्लक्षित? चार मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या जिल्ह्यात पर्यटकांचा जीव धोक्यात घालावा लागतोय, हे लाजिरवाणं नाही का?
आंदोलनाचा इशारा
नागरिक आणि व्यापारी वर्गाने तातडीने दिवाळीपूर्वी रस्ता खड्डेमुक्त करण्याची मागणी केली आहे. जर या रस्त्यांवर खड्डे तातडीने भरले नाहीत, तर आम्ही
रस्त्यावर उतरू आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा स्थानिक देत आहेत. व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे की रस्त्यांची दुर्दशा पाहून पर्यटक नाराज होतात. त्यामुळे महाबळेश्वर-पाचगणीतील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिकांची उलाढाल थेट कमी होते. रोजगारावरही परिणाम होतो.
पर्यटनाचं नुकसान
महाबळेश्वर आणि पाचगणीत दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पण या खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जे पर्यटक सुरक्षित, सुखकर प्रवासाची अपेक्षा घेऊन येतात, त्यांना नाराज होऊन परतावं लागत आहे.
चार मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री या जिल्ह्यात आहेत. तरीही रस्ते खड्डेमुक्त नाहीत. ही वस्तुस्थिती सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवते. महाबळेश्वर-पाचगणी रस्ता हा महाराष्ट्राच्या पर्यटनाचा मुख्य मार्ग आहे. त्याची झालेली दुर्दशा म्हणजे सातारा जिल्ह्यातील मंत्र्यांना आणि प्रशासनाला केव्हा दिसणार आहे.
चार मंत्री, एक उपमुख्यमंत्री असूनही जर पर्यटकांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असेल, तर दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला असून ररता दिवाळीपूर्वी खड्डेमुक्त झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
ठेकेदारांचा कारभार विकासाचा बळी
या मार्गाचं काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अखत्यारीत दिलं आहे. सुरूर-कुंभरोशी मार्गासह वाई-महाबळेश्वर हा प्रकल्प ठेकेदार कंपनीकडे गेला. आठ महिन्यांत रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन दाखवण्यात आले. पण आजपर्यंत फक्त कागदोपत्री विकास झाला आहे. रस्त्यावर काम कुठे आहे?
---
--