वायू गळतीप्रकरणी जेएसडब्ल्यु पोर्टच्या चौघांवर गुन्हा
रत्नागिरी :
जयगड वायुगळती प्रकरणात जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून जिंदल पोर्टच्या चौघा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वायुगळतीची बाधा झाल्याचे समजताच शुक्रवारी आमदार उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी घडल्या प्रकराला कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार सायंकाळी उशिरा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी जयगड पोलीस ठाण्यात कंपनीच्या चौघाजणांविरुद्ध तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जयगड पोर्टचे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय, भाविन पटेल तसेच अभियंते सिद्धार्थ कोरे व दीप विटलानी आदींचा समावेश आहे त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ डिसेंबर रोजी जयगड जेएसडब्ल्यु पोर्ट येथे एलपीजी गॅस प्लॅन्टचे देखभालीचे काम करण्यात येत होते. संशयित आरोपी गंगाधर व भाविन पटेल यांच्या निगराणीखाली सिद्धार्थ व दीप विटलानी हे काम करत होते. प्लांटमधील शिल्लक गॅससंबंधी काम सुरू असताना दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक गॅस गळती होऊन तो अचानक हवेत पसरण्यास सुरुवात झाली. गॅस आजूबाजूच्या परिसरात पसरू लागल्याने त्याचा परिणाम जवळच असलेल्या कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यामंदिरच्या मुलांवर झाला. उग्र वासाने विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच मळमळ होवून पोटामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या काही मुलांना चक्कर आल्यासारखे वाटू लागले. ६८ मुलांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा व पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प -शानाकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये जेएसडब्ल्यु कंपनीचे कर्मचारी दोषी असल्याचे समोर आले असून त्यानुसार जयगड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.