किश्तवाड चकमकीत चार जवान जखमी
ग्रामरक्षकांना ठार करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दोन ठिकाणी चकमक सुरू होती. पहिला संघर्ष श्रीनगरच्या जबरवान भागात झाल्यानंतर किश्तवाडच्या चास भागातही जोरदार चकमक झाली. किश्तवाड चकमकीत पॅरा स्पेशल फोर्सचे 4 जवान जखमी झाले आहेत. काश्मीर टायगर्स ग्रुपचे दहशतवादी किश्तवाडमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर येथे विशेष मोहीम उघडण्यात आली. या दहशतवाद्यांनी नुकतीच दोन ग्रामरक्षकांची हत्या केली होती. गेल्या 18 तासात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही तिसरी चकमक आहे. तर नोव्हेंबर महिन्यातील 10 दिवसांतील ही आठवी चकमक आहे. या संघर्षात आतापर्यंत एकूण 8 दहशतवादी मारले गेले आहेत.
रविवारी सकाळी सुरक्षा दलांना जबरवानमध्ये 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर लष्कर आणि पोलिसांनी सकाळी नऊच्या सुमारास दाचीगाम आणि निशातच्या वरच्या भागाला जोडणाऱ्या जंगलात संयुक्त शोधमोहीम राबवली. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. दिवसभर येथे चकमक व शोधमोहीम सुरू होती. जबरवान आणि किश्तवाडमधील चकमकीपूर्वी 9 नोव्हेंबरच्या संध्याकाळी बारामुल्लाच्या सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. 8 नोव्हेंबरलाही सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यापूर्वी रामपूरच्या जंगलातही चकमक झाली होती.