कुकी दहशतवाद्यांकडून चार तास गोळीबार
मणिपूरमधील दोन गावात तणावाची स्थिती
वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूरमध्ये शनिवारी रात्री उशिराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. कुकी दहशतवाद्यांनी कोत्रुक चिंग लेइकाई गावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती इंफाळ पश्चिम जिल्हा पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत संघर्ष सुरू होता. गोळीबारादरम्यान एक ड्रोनही निदर्शनास आल्याचे कोत्रुक चिंग लेइकाई येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
हा ड्रोन बेटेल गावातून लाँच करण्यात आला होता. या हवाई हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही गावात ड्रोन बॉम्बफेक झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी रात्री झालेला गोळीबार सुमारे चार तास सुरू होता, असे स्थानिक लोकांचे मत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कुकी दहशतवाद्यांनी गेल्जंग आणि मोलशांग भागातून रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार केला. या हल्ल्याला राज्य पोलीस दल आणि ग्राम स्वयंसेवकांनीही प्रत्युत्तर दिले. तसेच आता सीआरपीएफचे जवान दहशतवादी हल्ला परतवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दोघांना अटक
यापूर्वी ट्रोंगलाओबी गावात कुकी दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला होता. मात्र, दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. आसाम रायफल्सच्या पथकाने पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दोन पॅडरला मणिपूरच्या तेंगनौपाल जिह्यातील सीमा स्तंभ क्रमांक 87 येथून अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांची ओळख 21 वषीय एन प्रिया सिंग आणि 21 वषीय एस देवजीत सिंग अशी केली आहे. या कार्यकर्त्यांना पल्लेल पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.