उद्योजकाच्या फसवणूकप्रकरणी चार जीएसटी अधिकाऱ्यांना अटक
सीसीबी पोलिसांची कारवाई : एका महिला अधिकाऱ्याचाही समावेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
जीएसटी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेंगळूरमधील एका उद्योजकाला प्रकरण मिटविण्याचे सांगून 1.5 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप होता. या प्रकरणासंबंधी एका महिला अधिकाऱ्यासह चार जीएसटी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बेंगळूरच्या सीसीबी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे. दरम्यान, अटकेतील जीएसटी अधिकाऱ्यांना बेंगळूरमधील प्रथम एसीएमएम न्यायालयासमोर हजर केले असता 13 दिवसांसाठी सीसीबी कोठडी देण्यात आली आहे. जीएसटीच्या केंद्रीय गुप्तचर अधिकारी सोनाली सहाय, वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी मनोज सैनी, नागेश बाबू, अधीक्षक अभिषेक अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. प्रकरण मिटविण्यासाठी 1.5 कोटी रुपये घेऊन अधिकाऱ्यांनी पोबारा केला होता, असा आरोप करत केशव नामक उद्योजकाने बेंगळूरच्या बायप्पनहळ्ळी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) आणि जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून 30 ऑगस्ट रोजी आपल्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला होता. आपला मोबाईल व इतर वस्तू ताब्यात घेऊन दबाव टाकून इंदिरानगरला नेण्यात आले. कोणाशीही संपर्क साधू नये यासाठी माझा मोबाईल फ्लाईट मेडमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर माझे सहकारी रोशन जैन यांना व्हॉटस्अॅप कॉल करून 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. छाप्यावेळी इतर तीन उद्योजक मुकेश जैन, पवन आणि राकेश यांनाही ताब्यात घेऊन धमकावण्यात आले. 31 ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी नेऊन पैशांची मागणी करण्यात आली. अखेर 1.5 कोटी रु. जमा करण्यात रोशन यशस्वी झाले. ती रक्कम मुकेश जैन यांनी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली. पैसे स्वीकारल्यानंतर जीएसटी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून उद्योजकांना सोडून दिले, असा आरोप केशव यांनी केला होता. तक्रारीत हल्ला, धमकी आणि वसुलीचा आरोप अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. ठोस परवानगीशिवाय छापा टाकल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.