महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाची चार दशके

06:30 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संघटनेतर्फे आयोजित 36वे संमेलन कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावरती वसलेल्या सांगली शहरातल्या शांतिनिकेतन विद्यापीठाच्या सभागृहात यशस्वीपणे पार पडले ते बर्डसाँग संस्थेमार्फत संमेलनाध्यक्ष आणि पक्षीमित्र अजित ऊर्फ पापा पाटील यांच्या उपस्थितीत. या पृथ्वीतलावरच्या मानवी जीवनाच्या प्रारंभापासून त्यांचे जीवन सुरेल आणि समृद्ध करण्यात सनातन काळापासून त्यांच्या परिसरात वावरणाऱ्या विविधढंगी पक्ष्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जगभरात जी ठिकठिकाणी कातळावरती चित्रे रेखाटलेली आढळतात, त्यावरून आदिम काळापासून माणसाने पक्ष्यांशी निर्माण केलेल्या ऋणानुबंधांची प्रचिती येते. 1985 साली नाशिक येथे पार पडलेल्या पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन करताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रजांनी आपल्या भाषणात, ‘वाल्मिकी हा पहिला पक्षीमित्र होता’, असे  विधान केले होते. त्यावरून भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान लाभलेल्या रामायणाचा शुभारंभ, सायबेरिया या रशियाच्या प्रांतातून भारतात येणाऱ्या क्रौंच पक्ष्यांच्या संदर्भातील वाल्मिकी ऋषींच्या पक्षीनिरीक्षणाच्या अभिरुचीचे दर्शन घडवितो. मानवी संस्कृतीतल्या विविध पैलुंची प्रचिती आणून देणारे महाकाव्य माणसाला जुन्या काळापासून पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची कशी आवड होती, याची जाणीव करून देते.

Advertisement

पशु-पक्ष्यांच्या वास्तव्याने मानवी जगणे, त्या परिसरातल्या जैविक संपदेच्या भरण-पोषणाला साहाय्य लाभत असल्याने समृद्ध होण्यास मदत होते. पक्षीमित्रांनी 1981 साली लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात एकत्रित येऊन पक्षी निरीक्षण आणि नोंदी आणि यासंदर्भात पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास तसेच अन्य बाबींवरती चर्चा आरंभली. त्यातूनच पक्षीमित्र संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली गेली, ती प्रकाश गोळे यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर 1982 साली नागपूर येथे पक्षीमित्रांचे दुसरे संमेलन झाले. औरंगाबाद येथील जायकावाडी परिसरात प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि अभ्यासक डॉ. सलिम अली पक्षीमित्र संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आणि तेव्हापासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या चळवळीला अधिष्ठान लाभत गेले. काही मोजक्याच पक्षी निरीक्षण करणाऱ्या मित्रमंडळींच्या या चळवळीला महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद लाभत गेला. निसर्ग आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या मानवी समाजाच्या विविध विकास प्रकल्पांबरोबर औद्योगिकीकरण, नागरिकरणामुळे जंगलांनी समृद्ध पक्ष्यांचा अधिवास पाणथळीच्या जागा संकटग्रस्त होऊ लागल्या आणि त्यांचे दुष्परिणाम एकंदर पक्ष्यांवरती प्रकर्षाने जाणवू लागले. पक्षीमित्रांनी आयोजित केलेल्या संमेलनामुळे या साऱ्या प्रश्नांचा ऊहापोह करण्याच्या दृष्टीने समर्थ व्यासपीठ लाभले. मानवी समाजाची प्रारंभी स्वीकारलेली विकासाची प्रक्रिया निसर्ग आणि पर्यावरणाची दखल अभावाने घेत असल्याकारणाने झपाट्याने विस्मृतीत जाणाऱ्या जंगले, माळराने, पाणथळीच्या जागा यांच्या प्रश्नांना पक्षीमित्र संमेलनातून निर्माण झालेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून वाचा फुटली. पदभ्रमण, गिर्यारोहण, निसर्ग भ्रमंती करणाऱ्या मंडळींना पक्षी निरीक्षणाच्या छंदातूनच पक्ष्यांच्या सद्यस्थिती, नैसर्गिक अधिवास आणि त्यांच्या एकंदर अस्तित्वाला निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करून त्यासाठी निश्चित उपाययोजना करण्यासाठी पक्षीमित्र संमेलनाद्वारे व्यासपीठ लाभले. पक्ष्यांचा अभ्यास करताना, त्यांचे निसर्गातले वास्तव्य, संचार आणि त्यांच्या हालचाली, वृक्षवेली आणि किटकांशी असलेले संबंध आदींच्या निरीक्षण नोंदीतून खरेतर विज्ञानाच्या अभ्यासाला बळकटी लाभत असते.

Advertisement

महाराष्ट्र राज्य कृषी प्रधान असून, तेथील कोरडवाहू, ओलित, बागायती, भाजीपाला, फुलशेतीच्या जमिनीत पक्षी आढळतात. नानाविविध कृमीकिटकांच्या पैदासीसाठी शेतजमीन पुरक असल्याकारणाने, त्या परिसरात त्यांच्यावरती गुजराण करणाऱ्या पक्ष्यांचे वास्तव्य असते परंतु आज हरित क्रांतीद्वारे जंतुनाशके, किटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पक्ष्यांना निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या अन्नाच्या रसदीवरती दुष्परिणामांना सामोरे जावे लागते आहे. एकेकाळी चवदार मांसाच्या हव्यासापोटी पोर्तुगीजांच्या शिकारीत डोडो पक्षी यापूर्वीच नामशेष झाल्याचे उघडकीस आले होते. गुराढोरांना वेदनाशामक म्हणून मोठ्या प्रमाणात डायक्लोफेनेकचा वापर केल्याने, मृत जनावरांवर गुजराण करणाऱ्या गिधाडाच्या अस्तित्वावरती गदा आली. पाणथळीच्या जागा रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि तत्सम विकास प्रकल्पांपायी नष्ट झाल्याने, अशा अधिवासावरती अवलंबून असणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती संकटग्रस्त होत गेल्या. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पशु-पक्षी, कृमी किटक यांच्या अस्तित्वावर संकटे निर्माण झाल्याने आज त्याचे दुष्परिणाम माणसाच्या जीवनावर आणि उदरनिर्वाहाच्या एकंदर साधनांवर जाणवू लागलेले आहे. अशा बाबींवरती चर्चा करून, वर्तमान आणि आगामी काळात काय करणे शक्य आहे, याचा विचार पक्षीमित्रांनी राज्यस्तरावरती संमेलनाचे आयोजन करून आरंभलेला आहे, ही बाब देशात निसर्ग आणि पर्यावरणाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. लोणावळा येथून सुरू झालेले पक्षीमित्र संमेलन महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यात आवर्जून सहभागी होणाऱ्या पक्षी निरीक्षक, संशोधक, अभ्यासक, हौशी साथीदार यामुळे फलदायी आणि परिणामकारक ठरलेले आहे.

पक्षीमित्र संघटनेमार्फत गेली चार दशके राज्यस्तरावरती पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन केले जात असून, आज या चळवळीचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातल्या ठाणे खाडीचा, लोणारचा तलाव आणि नांदूर मधमेश्वर अशा तीन जागांचा महाराष्ट्रातल्या रामसर पाणथळ स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे. महाराष्ट्राच्या एकंदर भौगोलिक आकाराच्या तुलनेत पाणथळ स्थळांची आजमितीस सुरू असलेली दुरावस्था आणि हेळसांड चिंतेची बाब असून, त्यांच्या वर्तमान आणि आगामी काळातल्या संवर्धन आणि संरक्षणाला पक्षीमित्र संघटनेच्या चळवळीतून प्राधान्य लाभणे गरजेचे आहे. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यांतल्या पक्षी प्रजाती, पक्षी अधिवास आणि त्याच्या निरीक्षणांवरती आधारित पुस्तके प्रकाशित करून पर्यावरण जागृतीचे महत्त्व अधोरेखित करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी दशेत निसर्ग निरीक्षणाचा छंद लागला तर तो दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ती आवड निर्माण करण्यासाठी तालुका, जिल्हास्तरीय पक्षीमित्र संमेलन, चर्चासत्रे, निबंध लेखनांची सत्रे आयोजित करणे गरजेचे आहे.

यंदा पक्षीमित्र संघटनेचे हे संमेलन सांगलीत पार पडले. त्यात बर्डसाँग संस्थेमार्फत ‘सांगली जिल्हा : निसर्ग व पक्षी जीवन’ या विषयावरती स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अजित पाटील, प्रा. सुरेश गायकवाड, डॉ. रवींद्र व्होरा यांच्या पक्षी निरीक्षण अभ्यास आणि संशोधनामुळे या संस्थेच्या शिबिरांद्वारे, जैवविविधता प्रदर्शन, राष्ट्रीय चर्चासत्र आणि अन्य उपक्रमांमुळे या चळवळीला योग्य दिशा लाभलेली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने पक्षीविषयक ग्रंथांनी आणि वृक्षांनीयुक्त पालखीची दिंडी पार पडली. पक्ष्यांची पिसे काय सांगतात, या विषयीचे इशा मुन्शी, श्रेयस माणगावे, कृषी वनीकरणातील पक्षी याविषयीचे रोहित नानिवडेकर, पुणे शहराचा पक्षी नकाशा याविषयी पूजा पवार आदी संशोधकांनी केलेल्या सादरीकरणाने या संमेलनाला विशेष उंची लाभली. सांगलीच्या या संमेलनात प्रकाशित झालेल्या पक्षीगान आणि कोतवाल कथा संग्रह पुस्तकांनी पक्षीमित्रांबरोबर निसर्ग प्रेमींच्या अभ्यासाला चालना देण्याचे कार्य केलेले आहे. मारुती चितमपल्ली यांच्या ध्येय ध्यासाची पूर्तता करण्याची जबाबदारी आगामी काळात पुढे नेण्यासाठी डॉ. जयंत वडतकर आणि साथींची आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article